वसुधा-सुरेखातार्इंचे कार्यकर्ते संभ्रमात

By Admin | Updated: September 30, 2015 00:32 IST2015-09-30T00:32:58+5:302015-09-30T00:32:58+5:30

गेल्या काही वर्षांपर्यंत अचलपूर विधानसभा मतदारसंघावर पकड असलेल्या दोन तार्इंनी विधानसभा निवडणुकीपूर्वी..

Vasudha-Surekhaarai's activists confused | वसुधा-सुरेखातार्इंचे कार्यकर्ते संभ्रमात

वसुधा-सुरेखातार्इंचे कार्यकर्ते संभ्रमात

मूळ पक्षात परतण्याची प्रतीक्षा : पुन्हा जुने दिवस येण्याची आशा
लोकमत विशेष

सुनील देशपांडे अचलपूर
गेल्या काही वर्षांपर्यंत अचलपूर विधानसभा मतदारसंघावर पकड असलेल्या दोन तार्इंनी विधानसभा निवडणुकीपूर्वी आपल्या पक्षांना सोडचिठ्ठी देत दुसऱ्या पक्षांची साथ धरली. माजी पालकमंत्री वसुधा देशमुख यांनी काँग्रेससोबत काडीमोड घेत हातावर राष्ट्रवादीचे घड्याळ बांधले. तर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ काढून खांद्यावर शिवसेनेचा भगवा घेतला. दोघींना विधानसभेची उमेदवारीही मिळाली होती. परंतु या दोघींचे अचलपूर-परतवाड्यासह तालुक्यातील निष्ठावान कार्यकर्ते अद्यापही संभ्रमात आहेत.
काँग्रेसच्या माजी मंंत्री वसुधाताई देशमुख व राष्ट्रवादीच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा ठाकरे या नेत्या पक्षनिष्ठ म्हणून परिचित होत्या. या दोन्ही ताईंनी निवडणुकी दरम्यान विविध कारणांनी दुसऱ्या पक्षांमध्ये प्रवेश केला. त्यांच्यावर निष्ठा असलेले पक्षातील काही कार्यकर्ते त्यांच्या मागोमाग गेले. पण, त्या पराभूत झाल्यानंतर यापैकी अनेक जण दुसऱ्या पक्षात रमले नाहीत. त्यामुळे अनेक जण मूळ पक्षात परतले आहेत. त्यापैकी काहींना आपल्या ताई आपल्या पक्षात परत येतील, असा विश्वास वाटतो तर काहींचा संभ्रम अद्यापही कायम आहे. या दोन्ही तार्इंचा अचलपूर व चांदूरबाजार तालुक्यातील राजकारणात दबदबा होता. त्यांना मानणारा मोठा वर्ग होता. त्यांनी कार्यकर्ते जोडले होते. गेल्या विधानसभेत दोघींनी राजकीय वाटा बदलल्याने त्यांचे कार्यकर्ते संभ्रमात होते. पक्षनिष्ठेला महत्त्व द्यायचे की व्यक्तीनिष्ठेला असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला होता. बहुतांश कार्यकर्त्यांनी पक्षनिष्ठेलाच महत्त्व दिले. पण व्यक्तीनिष्ठेपायी पक्ष बदलेल्या कार्यकर्त्यांची मात्र अडचण झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
विधानसभेत पराभूत झाल्यापासून या दोन्ही तार्इंचा अचलपूर मतदारसंघाशी फारसा संपर्क नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांना नेमकी काय भूमिका घ्यावी, हेच कळत नाही. काहींना ताई आपल्या मूळ पक्षात परत येतील, असा विश्वास वाटतो. त्या आपल्या मूळ पक्षात परतल्यास त्याचे जनतेला नवल वाटणार नाही. विधानसभा निवडणुकीनंतर निर्माण झालेली स्थिती कार्यकर्त्यांसाठी अत्यंत अडचणीची ठरली होती. मात्र, लवकरच या दोन्ही ताई मूळ पक्षात परततील आणि पूर्वीसारखी स्थिती निर्माण होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांना वाटतो. असे झाल्यास पुढचे चित्र बरेच आशादायी असेल, असेही जाणत्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

सुरेखाताई ठाकरे विधानसभेच्या उमेदवार असताना प्रचारादरम्यान आजारी पडल्याचा मला फोन आला. मी तत्काळ तेथे जाऊन मदत केली. त्यांचेसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही कार्यकर्ता प्रचारात नव्हता. त्यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय आम्हाला न विचारता घेतला. पुन्हा त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परततील, असा आम्हाला विश्वास आहे.
- माधुरी शिंगणे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी महिला काँग्रेस, परतवाडा.

वसुधाताई राष्ट्रवादीमध्ये जाऊ नये म्हणून आम्ही त्यांना विनंती केली. त्यांचेसोबत काही कार्यकर्ते गेले होते ते विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा काँग्रेसमध्ये परत आले. वास्तविक पक्षाने त्यांचेवर शिस्तभंगाची कारवाई करायला हवी होती.मात्र केली नाही. वसुधाताई राष्ट्रवादीत गेल्याने काँग्रेसला जास्त फरक पडला नाही. त्या पुन्हा काँग्रेसमध्ये येतीलच, असे आम्हाला वाटते.
- श्रीकांत झोडपे, तालुकाध्यक्ष.

सुरेखातार्इंना विधानसभेची उमेदवारी मिळाल्याने जुने आणि कट्टर शिवसैनिक नाराज झाले होते. त्यामुळे अनेकांनी त्यांचा प्रचार न करता घरी बसणे पसंत केले होते. शिवसेना नेते रामदास कदम यांच्याकडे तार्इंनी याबाबत तक्रार केली. त्यावर जाब विचारण्यात आला. आम्ही त्यावर लेखी खुलासा दिला. आम्ही प्रामाणिकपणे शिवसेनेचे काम केले.
- नरेंद्र फिसके, माजी उपनगराध्यक्ष तथा शिवसेना माजी तालुका प्रमुख

Web Title: Vasudha-Surekhaarai's activists confused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.