बेल नदीवरचा वसंत बंधारा मृतावस्थेत
By Admin | Updated: May 21, 2016 00:12 IST2016-05-21T00:12:45+5:302016-05-21T00:12:45+5:30
तालुक्यात जलसिंचनाकरिता अनेक प्रयोग करून संत्राबागा, बागायती शेती जगविण्याचे प्रयोग करण्यात आले.

बेल नदीवरचा वसंत बंधारा मृतावस्थेत
सिंचन विभागाचे दुर्लक्ष : १६० हेक्टर सिंचन क्षमता
वरूड : तालुक्यात जलसिंचनाकरिता अनेक प्रयोग करून संत्राबागा, बागायती शेती जगविण्याचे प्रयोग करण्यात आले. याच श्रुंखलेत सांवगी (जिचकार) येथील १६० हेक्टर सिंचनक्षमता असलेला बेलनदीवर वसंत बंधारा बांधण्यात आला होता तो देखभाल, दुरुस्तीअभावी मृतावस्थेत असल्याचे चित्र आहे.
सन १९७१ मध्ये वसंतराव नाईक राज्याचे मुख्यमंत्री असताना गुरूत्वाकर्षण शक्तीवर पाणी वळविण्याची योजना आणली होती. या योजनेला वसंत बंधारा असे नाव होते. परंतु ही योजना नद्या वाहत्या असल्या म्हणजेच यशस्वी होत होत्या. अलिकडच्या काळात नद्या कोरडया असल्याने वसंत बंधारे ओस पडले आहेत. परंतु सिंचन विभाग आणि लोकप्रतिनीधींना या गोष्टीचा विसर पडल्याने ४६ वर्षांपूर्वी २० हजार रूपयांत बांधलेला वसंत बंधारा बेवारस पडला आहे. तालुक्यात असे बंधारे सावंगी आणि चिंचरगव्हाण येथे बांधण्यात आले आहेत.
ड्रायझोनमुक्तीकरिता अनेक प्रयोग केले जातात. तालुक्यात ९ सिंचन प्रकल्प असून पाच ते सहा लघु आणि मध्यम प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर आहे. परंतु ४६ वर्षांपूर्वी सावंगी आणि चिंचरगव्हाण येथे सन १९७१ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी बारमाही वाहत्या नदीतून ‘पाणी वळवा’ प्रकल्पांतर्गत वसंत बंधारे आणले होते. काही दिवसांनी नदी कोरडी झाल्याने कालव्याची दुर्दशा झाली. सावंगीच्या वसंत बंधाऱ्याची त्या काळात केवळ २० हजार रुपयांत निर्मिती करण्यात आली होती. येथून गुरूत्वाकर्षणाव्दारे शेतात कालव्याच्या, पाटचऱ्यांच्या माध्यमातून पाणी नेऊन सिंचन केले जात होते. या बंधाऱ्याची क्षमता १६० हेक्टर जमिनीचे सिंचन करण्याची आहे. परंतु ४६ वर्षांपासून मृतावस्थेतील बंधाऱ्याकडे कुणी लोकप्रतिनिधी किंवा अधिकाऱ्यांनी लक्षच दिले नाही तर उलट नवनीवन प्रयोग करतात कधी श्रमदानातून तर कधी रोजगार हमी योजनेतील ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ अभियानावर काम केले जाते. परंतु आजही तालुक्यात शेकडो सिमेंट बंधारे, कोल्हापुरी बंधारे धूळखात पडून आहेत. या बंधाऱ्याची संकल्पना आताच्या वर्धा डायव्हर्शनसारखीच होती. यातून कालवे आणि पाट काढून सिंचनाकरीता पाणी वापरात आणले जाणार होते. परंतु राजकारण्याचे दुर्लक्ष व अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे तेव्हाचे लाखो रुपये पाण्यात गेले.
या बंधाऱ्यामुळे सावंगी, आमपेंड, मुसळखेडा, वाठोडा, एकदरा, ढगा, नायगांव, उदापूर, घोराड, खानापूर मेंढी, देवूतवाडा जवळपास एक हजार हेक्टर जमीन लाभक्षेत्रात येणार होती. यामुळे या परिसराचा कायापालट करण्याची योजना होती. परंतु बांधकामानंतर या बंधाऱ्याची दुर्दशा झाली भिंती, दरवाजे, पाईपलाईन ओस पडल्या. या बधांऱ्याची देखभाल दुरस्ती केली असती तर आज शेतकऱ्यांना पाणी टचांईला सामोरे जावे लागले नसते. पंरतू या बंधाऱ्याला राजाश्रय तर मिळाला नाही तर अधिकाऱ्यांनीसुद्धा कधीकाळी ढुंकून पाहिले नाही. एकीकडे वॉटर कपच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे श्रमदानातून केली जात आहे. काही शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन कालवा साफसफाई केली. परंतु यामध्ये पाणी येणार तरी कुठून, हा प्रश्न आहे. बंधाऱ्याच्या भिंतीला गेट नाही. पाणी अडविल्या जात नाही. केवळ राजकारणाला राजकारण करीत याकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले जात आहे. बंधाऱ्याची देखभाल आणि दुरस्ती केल्यास याचा लाभ हजारो शेतकऱ्यांना होऊन शेकडोे हेक्टर सिंचन केले जाऊ शकते. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघू शकतो. यासाठी बंधाऱ्याचे पुनरूज्जीवन होणे महत्त्वाचे आहे. (तालुका प्रतिनिधी)
देखभाल,दुरुस्तीचा प्रस्ताव १० वर्षांपासून धूळखात !
पाटबंधारे विभागाच्या शेकदरी सिंचन व्यवस्थापन शाखेच्यावतीने तालुक्यातील वसंत बंधारे, कोल्हापुरी बंधारे तसेच प्रकल्पाच्या देखभाल दुरस्तीकरिता केंद्रशासनाला दुरस्ती, संचय आणि नूतणीकरण अभियानामध्ये १० वर्षांपासून प्रस्ताव पाठविला आहे. परंतु केंद्रीय जलआयोगाने अद्यापही परवानगी दिली नसल्याने हा प्रस्ताव धूळ खात आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास बंधाऱ्याचा कायापालट होऊ शकतो, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.