वरूडकरांच्या फसवणुकीचा आकडा कोट्यवधींवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:32 IST2021-01-13T04:32:07+5:302021-01-13T04:32:07+5:30

पान २ ची लिड वरूड : दैनंदिन ठेवी संकलनकर्त्या महिलेने अन्य दोघांच्या साहाय्याने येथील चौघांची सुमारे २८ लाख रुपयांनी ...

Varudkar's fraud number in crores! | वरूडकरांच्या फसवणुकीचा आकडा कोट्यवधींवर!

वरूडकरांच्या फसवणुकीचा आकडा कोट्यवधींवर!

पान २ ची लिड

वरूड : दैनंदिन ठेवी संकलनकर्त्या महिलेने अन्य दोघांच्या साहाय्याने येथील चौघांची सुमारे २८ लाख रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यात ९ जानेवारी रोजी आणखी तीन तक्रारकर्ते समोर आलेत. त्यांच्या फिर्यादीची नोंद घेण्यात आली. त्यामुळे तूर्तास लाखांच्या घरात असलेली ही फसवणूक कोट्यवधीच्या घरात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यात एका महिलेसह दोन पुरुषांचा सहभाग दिसून येत असला तरी तपासादरम्यान यात अनेक बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.

वरूड येथील महेंद्र गंगाधर काठीवाले यांची २०१४-१५ मध्ये एका महिलेने १९ लाख रुपये किमतीच्या सोने घेऊन लुबाडणूक केली होती. त्यांनी सन २०१५ आणि २०१७ मध्ये तक्रारदेखील दिली. मात्र, तत्कालीन ठाणेदारांनी सदर प्रकरणात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद घेतली. पाच वर्षे प्रकरण केवळ चौकशीत राहिले. मात्र, अलीकडे आयपीएस श्रेणिक लोढा यांनी धडाकेबाज कारवाई करून वरूडकरांची मने जिंकली. परिणामी काठीवाले यांनी चार वर्षांनंतर पुन्हा ते प्रकरण लोढा यांच्यासमक्ष नेले. त्यांनीही प्रकरणाचे गांभीर्य व आर्थिक फसवणुकीची व्याप्ती पाहता, गुन्हा नोंदविण्याचीे निर्देश दिले. काठीवाले यांच्या तक्रारीवरून वरूड पोलिसांनी ६ जानेवारीला रात्री ११.३० वाजता आरोपी कल्पना मनोहर श्रीराव, दीपक शिवनारायण खंडेलवाल (बटवाडा) आणि प्रवीण धरमठोक (सर्व रा. वरूड) यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ४०६, ४२०, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच आरोपींनी शहरातून पळ काढून अटकपूर्व जामिनाकरिता न्यायालयाकडे धाव घेतली होती. जिल्हा सत्र न्यायालयाने ८ जानेवारी रोजी दीपक खंडेलवाल आणि प्रवीण धरमठोक यांना अंतरिम जामीन मंजूर केला. आठवड्यातून दोन दिवस पोलीस ठाण्यात हजेरी, तपासी अधिकारी यांना वेळावेळी तपासामध्ये सहकार्य, या अटी-शर्तींवर अंतरिम जामीन देण्यात आला आहे. महिला आरोपी कल्पना श्रीराव हिच्या जामिनावर सुनावणी होणार आहे.

यांनी केली तक्रार

महेंद्र काठीवाले यांच्यानंतर या प्रकरणात ९ जानेवारी रोजी स्थानिक पोलिसांत तीन तक्रारी दाखल करण्यात आल्या. वसंत पांडुरंग श्रीराव (५७), वैशाली वसंत श्रीराव (४७, दोन्ही रा. ब्राह्मणपुरी, वरूड) व कमला पुंजाराम गुल्हाने (६२ रा. राजुरा बाजार) अशी तक्रारकर्त्यांची नावे आहेत. यातील श्रीराव यांची २ लाख ५० हजार रोख आणि ५० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने अशी तीन लाख रुपयांनी आणि गुल्हाने यांची २ लाख २५ हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली. आणखी बरेच तक्रारदार पुढे येणार असण्याची शक्यता आहे. तपास ठाणेदार श्रेणीक लोढा यांचे मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक हेमंत चौधरीसह वरूड पोलीस करीत आहेत.

कोट

तीन व्यक्तींनी आरोपी कल्पना श्रीराव आणि दीपक खंडेलवाल यांच्याविरुद्ध फसवणूक केल्याची तक्रार दिली आहे. आणखी कुणाची फसवणूक झाली असेल, त्या तक्रारदारांनी पुढे यावे.

- हेमंत चौधरी, तपास अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक

------------------

Web Title: Varudkar's fraud number in crores!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.