लग्न वऱ्हाड वाहून नेणारे ‘ते’ वाहन खासगी की शासकीय ?
By Admin | Updated: February 15, 2016 00:29 IST2016-02-15T00:29:54+5:302016-02-15T00:29:54+5:30
लग्न वऱ्हाड घेऊन राजरोसपणे ‘महाराष्ट्र शासन’ लिहिलेले चारचाकी वाहन अमरावती-परतवाडा मार्गावर फिरताना दिसून येते. मात्र, हे वाहन वाहन खासगी की शासकीय? हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

लग्न वऱ्हाड वाहून नेणारे ‘ते’ वाहन खासगी की शासकीय ?
नरेंद्र जावरे परतवाडा
लग्न वऱ्हाड घेऊन राजरोसपणे ‘महाराष्ट्र शासन’ लिहिलेले चारचाकी वाहन अमरावती-परतवाडा मार्गावर फिरताना दिसून येते. मात्र, हे वाहन वाहन खासगी की शासकीय? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, नियमांची पायमल्ली करून बेदरकारपणे धावणाऱ्या या चारचाकीकडे कुणाचीच नजर जाऊ नये, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
अमरावती-परतवाडा मार्गावर वलगावच्या पुढे १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.१२ वाजता एम.एच.३७ डी. १००१ ही लाल रंगाची कार भरधाव धावते. त्या वाहनाच्या मागच्या काचेवर ‘महाराष्ट्र शासन’ तर दुसऱ्या बाजूला लग्न वऱ्हाडाचे नाव ठळक अक्षरात लिहिलेले होते. सुसाट वेगात निघालेले हे वाहन इतर वाहनांना मागे टाकत क्षणात दिसेनासे होते. आश्चर्य म्हणजे अमरावती ते परतवाड्यापर्यंत रस्त्यावर तैनात एकाही वाहतूक कर्मचाऱ्याच्या लक्षात ही बाब येत नाही. शासकीय वाहन समजून त्याकडे दुर्लक्ष केले जाते.
खासगी वाहन शासकीय दिमतीला
निवडणुकीसह काही महत्त्वपूर्ण कामानिमित्त खासगी वाहने शासकीय कामांसाठी वापरण्यात येते. अशावेळी त्यावर ‘महाराष्ट्र शासन’ किंवा ‘आॅन इलेक्शन ड्युटी’ असे ठळकपणे लिहिले जाते. बरेचदा इतर विभागसुध्दा खासगी वाहनांचा भाडेतत्त्वावर उपयोग करतात. मात्र, त्यांचा करारनामा संपल्यावर वाहन मालक वाहनावरील ‘महाराष्ट्र शासन’ ही अक्षरे कायम ठेवतोे. पोलिसांची एन्ट्री किंवा नाक्यावरील तपासणी, टोल-टॅक्स मुक्तीसाठी याचा उपयोग होतो. मात्र, या फलकाआडून गैरप्रकारही फोफावले आहेत.