वाडे भंगले, बैल खंगले, जीव झाडाले टांगले!
By Admin | Updated: September 12, 2015 00:13 IST2015-09-12T00:13:35+5:302015-09-12T00:13:35+5:30
शेती उत्पादनाचा खर्च दरवर्षी वाढत आहे. मिळणारे उत्पन्न व त्यावर झालेला खर्च याचा ताळमेळ शेतात राब राबून हाडे ...

वाडे भंगले, बैल खंगले, जीव झाडाले टांगले!
शेतकऱ्यांचा पोळा : पारंपरिक उत्सवावर नैराश्याचे सावट
संजय जेवडे नांदगाव खंडेश्वर
शेती उत्पादनाचा खर्च दरवर्षी वाढत आहे. मिळणारे उत्पन्न व त्यावर झालेला खर्च याचा ताळमेळ शेतात राब राबून हाडे झिजविणाऱ्या शेतकऱ्यांना जमला नसल्याने शेती व्यवसाय तोट्यात आला आहे. एकीकडे गावाला सोन्याचे भाव आले. कितीही काबाडकष्ट करून उभ्या आयुष्यात शेतीच्या उत्पन्नातून शिल्लक ठेवून एक एकर शेतीही शेतकऱ्याला खरेदी करणे शक्य होत नाही. उलट आहे ती शेती कमी करण्यासाठी विक्रीस काढली जाते व थोडीफार शेती विकून त्यातून येणाऱ्या पैशावर घर बांधणे व इतर व्यवहार निभवणे असे जीणे शेतकऱ्यांच्या नशिबी आले आहे.
कृषिप्रधान देशात 'शेतकरी आत्महत्या' हा विषय चिंतेचा ठरला आहे. पोळा हा शेतकऱ्यांचा आनंदाचा सण. पूर्वी प्रत्येक वाड्यात चार-पांच बैलजोड्या राहायच्या. त्याच्या दिमतीसाठी गडी-माणसे राबायची. पण अलीकडे काळ झपाट्याने बदलला आहे. कित्येक नांदलेल्या सधन वाड्यात आता पुजेलाही बैल नाही, अशी स्थिती आहे. शेतीसाठी बैलजोडी पोसणे आता महागडे झाले आहे. बैलजोडीच्या संगोपनासाठी गडीमाणसे ठेवावी लागतात. पण आता शेतमजुरीचे दर वाढले आहे व आता नवीन पिढी शेती करण्यापेक्षा पानटपरीसारखे व्यवसाय करणे पसंत करतात. पण शेतीत ढोरकष्ट करण्याची मानसिकता नसल्याने शेती व्यवसाय लयास गेला आहे.
पूर्वी पोळ्याच्या सणाला दोन दिवस शेतकऱ्यांच्या घरी धामधूम असायची. पहिल्या दिवशी खांद मळणी व दुसऱ्या दिवसी पोळ्याला गडीमाणसे शेतकऱ्यांच्या घरी जेवायला राहात असे. शेतकरी गडीमाणसांना नवे कपडे शिवायचे. झडीच्या मोसमात शेतीचे कामकाज चालत नसल्याने गडीमाणसे पळसाच्या मुळ्यापासून (वाक काढून) त्यापासून बैलांचे दोर, मटाटी, चवरं तयार करायचे. आता सारं काही रेडीमेड. तेही नॉयलॉनचे अशाप्रकारे काळ बदलला आहे. कित्येक शेतकऱ्यांकडे आता बैलजोडीही नाहीत. ट्रॅक्टरने व भाड्याने बैलजोड्या सांगून शेती व्यवसाय सुरू आहे. नांदगावात पूर्वी ८ पोळे भरायचे आता फक्त चारच पोळे भरतात. कृषीधन कमी झाल्याचा हा परिणाम आहे.
गेल्या १५ वर्षांत कृषिमालाचे भावाच्या तुलनेत इतर वस्तूंचे दर महागाई निर्देशांकानुसार तीनपट वाढले आहे. दुसरीकडे बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, आंतरमशागत व तत्सम प्रक्रियेचा खर्च तीनपट वाढला आहे.
प्रत्यक्षात कृषीमाल विकून मिळणारे उत्पन्न आजही जैसे थेच आहे. ग्रामीण व्यवस्थेत श्रम करणाऱ्या पिढीला प्रतिष्ठा मिळत नसून त्यांचा अनादर होतो. मुलीचे विवाह, आजार व इतर गरजा भागविण्यासाठी शेतकरी वडिलोपार्जित शेती विकत आहे. ‘गो-धन पन्नास टक्के कमी झाले आहेत. सणासाठी कित्येक वाड्यांत आता पुजेलाही बैल दिसत नाही, ही तालुक्याची शोकांतिका आहे.