वलगाव ठाणे गुन्हेगारी घटनांनी हादरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 23:00 IST2018-04-08T23:00:56+5:302018-04-08T23:00:56+5:30
शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील मात्र, शहराबाहेरील वलगाव ठाणे शनिवारी व रविवारी गुन्हेविषयक घटनांनी हादरले. महिलेवर बलात्कार, दोन चाकूहल्ले व मारहाणीच्या घटनांमुळे वलगाव परिसरात तणावसदृश स्थिती निर्माण झाली होती.

वलगाव ठाणे गुन्हेगारी घटनांनी हादरले
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील मात्र, शहराबाहेरील वलगाव ठाणे शनिवारी व रविवारी गुन्हेविषयक घटनांनी हादरले. महिलेवर बलात्कार, दोन चाकूहल्ले व मारहाणीच्या घटनांमुळे वलगाव परिसरात तणावसदृश स्थिती निर्माण झाली होती.
वलगाव ठाण्याच्या परिसरात गुन्हेविषयक घटना कमी असतात. मात्र, दोन दिवसांत चार गंभीर घटना समोर आल्याने तणावाचे वातावरण निर्मीत झाले होते. शनिवारी सतीनगर, अशोकनगरात हाणामारीच्या घटना घडल्या, तर रविवारी धनगर पुऱ्यातील एका तरुणांवर चाकूने प्राणघातक हल्ला चढविण्यात आला आहे.
वलगावात तरुणाला चाकूने भोसकले
धनराजपुऱ्यातील श्रीकांत दादाराव काळमेघ (२४,रा. धनगरपुरा) या तरुणावर रविवारी चाकू हल्ला झाला. नावेद खाँ नामक तरुणाने हा हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचा संताप व्यक्त करीत शेकडो नागरिकांनी रविवारी सायंकाळी वलगाव ठाण्यावर धडक दिली.
दोन कुटुंबीयांमध्ये वाद उफाळला
वलगाव ठाण्यांतर्गत सतीनगरात दोन कुटुंबीयांचा वाद शनिवारी उफाळून आला. रहिम खान गुलाबर खा यांच्या तक्रारीनुसार आरोपी रहेमान शहा आमद शहा, शाहीर शहा रहेमान शहा, रोशन शहा रहमान शहा व एक महिला हे त्याच्या मेहुण्याला व त्यांच्या पत्नीला मारहाण करीत होते. भांडण सोडविण्यासाठी रहिम खान गेले असता त्याच्यावर रोशनने चाकू मारल्याचे तक्रारीत म्हटले आहे. शाहीद शा वल्द रहमान शहा यांच्या तक्रारीनुसार वरील फिर्यादी पक्षाविरुद्ध गुन्हे नोंदविले आहे.
चाकुच्या धाकावर लैंगिक अत्याचार
चाकुचा धाक दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना शनिवारी सतीनगरात घडली. वलगाव पोलिसांनी शाहीर शहा रहेमान शहा (३२) व रोशन शहा रहेमान शहा (दोन्ही रा. सतीनगर) यांचेविरुद्ध भादंविच्या कलम ३७६(ड) अन्वये गुन्हा नोंदविला आहे. एक महिला शनिवारी दुपारी घरी एकटीच असताना आरोपी तिच्या घरात शिरले. आरोपी शाहीर शहा याने महिलेस चाकूचा धाक दाखविला आणि आरोपी रोशन शहा याने जबरीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप महिलेने तक्रारीतून केला आहे.