इर्विनमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या वार्डात लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:12 IST2021-03-07T04:12:47+5:302021-03-07T04:12:47+5:30
अमरावती : जिल्ह्यात ज्येष्ठांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण प्रक्रिया गतिमान झाली आहे. यात केंद्रांची संख्या वाढविण्यात आली असून, महापालिका ...

इर्विनमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या वार्डात लसीकरण
अमरावती : जिल्ह्यात ज्येष्ठांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण प्रक्रिया गतिमान झाली आहे. यात केंद्रांची संख्या वाढविण्यात आली असून, महापालिका क्षेत्रातील सहा नव्या केंद्रांसह जिल्हा रुग्णालयाच्या ज्येष्ठ नागरिक वॉर्डातही नवे केंद्र सुरू करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी त्या केंद्राची पाहणी केली.
जिल्हा रुग्णालयाच्या नर्सिंग स्कूलमध्ये दोन व आता ज्येष्ठ नागरिक वॉर्डात एक अशी ३ केंद्रे कार्यान्वित करण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी सांगितले. महापालिकेद्वारा पीडीएमसी व दंतचिकित्सा महाविद्यालयापाठोपाठ आणखी सहा केंद्रे वाढविण्यात आली. त्याशिवाय, शहरातील मुरके हॉस्पिटल, चौधरी रुग्णालय, सुझान कॅन्सर हॉस्पिटल, हायटेक रुग्णालय, मातृछाया रुग्णालय, अच्युत महाराज रुग्णालय या खासगी रुग्णालयांतही लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
महापौर चेतन गावंडे यांच्या उपस्थितीत भाजी बाजारातील केंद्रावर आझाद हिंद मंडळाचे ज्येष्ठ सदस्य प्रकाश संगेकर व नीळकंठ मंडळाचे ज्येष्ठ सदस्य प्रमोद गंगात्रे यांना लस देऊन मोहिमेचा शुभारंभ झाला. आयुक्त प्रशांत रोडे, माजी महापौर विलास इंगोले, माजी स्थायी समिती सभापती विवेक कलोती, नगरसेवक आशिष अतकरे, उपायुक्त रवि पवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी विशाल काळे उपस्थित होते. बडनेऱ्यातील मोदी हॉस्पिटलमध्ये महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत ज्येष्ठ पत्रकार आणि माजी मुख्याध्यापक भास्करराव कुळकर्णी यांना लस देऊन केंद्राचे उद्घाटन झाले.
बॉक्स
महापालिकेची नवी सहा केंद्रे
येथील दसरा मैदानातील आयसोलेशन दवाखाना, बडनेऱ्यातील मोदी हॉस्पिटल, भाजीबाजारातील शहरी आरोग्य केंद्र, महेंद्र कॉलनीतील आरोग्य केंद्र, दस्तुरनगरातील आरोग्य केंद्र व नागपुरीपेटच्या पालिका शाळेत केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. याशिवाय सोमवारपासून ग्रामीणमध्ये प्राथमिक स्वास्थ्य केंद्रात लसीकरण सुरू होणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.