आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पहिल्या टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:12 IST2021-02-07T04:12:19+5:302021-02-07T04:12:19+5:30
चांदूर बाजार : तालुक्यात कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात तालुक्यातील आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लसीकरण ...

आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पहिल्या टप्प्यात
चांदूर बाजार : तालुक्यात कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात तालुक्यातील आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात महसूल व सर्व संबंधित कार्यालयांतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे.
स्थानिक ग्रामीण रुग्णालयात लसीकरण कक्ष उभारण्यात आला आहे. ग्रामीण भागातील लसीकरणाचे सर्व सूत्रे जिल्हास्तरावरून नियंत्रित करण्यात येत असल्याने सर्वच प्रक्रिया ऑनलाईन आहे. लसीकरणासाठी ग्रामीण रुग्णालयात तीन कक्ष उभारण्यात आले असून, पहिल्या कक्षातील लसीकरण यादीत समाविष्ट व्यक्तीची व त्याच्या आरोग्याची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून पडताळणी केली जाते. गंभीर आजारी असल्यास, त्या व्यक्तीला लस देण्यात येत नाही. सदर व्यक्ती लसीकरणास सक्षम असल्यास तिला लसीकरण कक्षात पाठविले जाते. त्यानंतर त्या व्यक्तीला ३० मिनिटे दक्षता कक्षात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निगराणीत ठेवल्या जाते. स्थिती सामान्य असल्यास सुटी देण्यात येते.
लसीकरणाला पंचायत समिती सभापती राजेश वाटाणे यांनी प्रारंभ केला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, तहसीलदार धीरज स्थूल, गटविकास अधिकारी प्रफुल भोरगडे, डॉ. मुकुंद मोहोड, नायब तहसीलदार अर्जुन वांदे, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. संध्या सालकर उपस्थित होत्या. तालुक्यातील कोरोना लसीकरणाचा पहिला मान ब्राह्मणवाडा थडीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलेश खोंडे यांना मिळाला.
५०० लसी उपलब्ध
जिल्हास्तरावरून लसीकरणाकरिता ५०० लसी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वैद्यकीय अधिकारी, आशा, अंगणवाडी सेविका अशा सुमारे ९०० कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. चांदूर बाजार येथे पहिल्याच दिवशी इंटरनेटची समस्या निर्माण होत असल्याने लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकले नसल्याची माहिती मिळाली आहे. गरजेनुसार जिल्हास्तरावरून लसींचा पुरवठा करण्यात येणार आहे.