लसीकरण, २७,९०० डोज प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:13 IST2021-05-06T04:13:58+5:302021-05-06T04:13:58+5:30
अमरावती : जिल्ह्यात कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन मिळून २७,९०० डोज प्राप्त झाले आहेत. शासनाच्या निर्देशानुसार ऑनलाईन नोंदणी केलेल्या तरुणांचे पहिल्या ...

लसीकरण, २७,९०० डोज प्राप्त
अमरावती : जिल्ह्यात कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन मिळून २७,९०० डोज प्राप्त झाले आहेत. शासनाच्या निर्देशानुसार ऑनलाईन नोंदणी केलेल्या तरुणांचे पहिल्या मात्रेचे लसीकरण व पूर्वी लस घेतलेल्या ज्येष्ठांना दुसरी मात्रा असे नियोजनपूर्वक लसीकरण स्वतंत्र केंद्रांवर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी दिले.
जिल्ह्यातील लसीकरण, तसेच शासकीय व खासगी रुग्णालयातील स्थिती व आवश्यक उपाययोजनांबाबत जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे सीईओ अविश्यांत पंडा, पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन., महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांच्यासह खासगी रुग्णालयांचे प्रतिनिधी व डॉक्टर यावेळी उपस्थित होते. यापूर्वी कोविशिल्ड लस घेतलेल्या ४५ वर्षांवरील व्यक्ती व ज्येष्ठांना दुसरी मात्रा मिळण्यासाठी १५,९०० कोविशिल्ड लस प्राप्त झाली आहे. त्यामुळे या लसीचा दुसरा डोज पूर्वीच्याच शासकीय लसीकरण केंद्रावर उपलब्ध असेल. हे लसीकरण टोकन पद्धतीने करणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांनी सांगितले. कोव्हॅक्सिनचे १२ हजार डोज प्राप्त झाले असून, ही लस केवळ पहिला डोज घेणाऱ्या तरुणांसाठीच आहे.
बॉक्स
तरुणाईच्या लसीकरणासाठी १५ केंद्र
महापालिका क्षेत्रात सबनीस प्लॉट येथील पालिका रुग्णालय, बिच्छु टेकडी येथील पालिका रुग्णालय, विलासनगर येथील पालिका रुग्णालय ग्रामीण भागात यावली शहीद रुग्णालय, भातकुली ग्रामीण रुग्णालय, शिरजगाव बंड (चांदूर बाजार) आरोग्य उपकेंद्र, सातरगाव (नांदगाव खंडेश्वर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, दर्यापूर, तिवसा, मोर्शी, अंजनगाव सुर्जी व वरूडमधील दोन लसीकरण केंद्रे आहेत. येथे ऑनलाईन रजिस्ट्रेशन व अपॉईंटमेंटनंतर लसीकरण केंद्रावर येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.