User ID, password only on new hall ticket | नव्या हॉल तिकीटवरच यूझर आयडी, पासवर्ड 

नव्या हॉल तिकीटवरच यूझर आयडी, पासवर्ड 

ठळक मुद्देअंतिम वर्षांची परीक्षा : संचालकांचा व्हिडीओद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद 

लोकमत न्यूज नेटवर्क 
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अंतिम वर्षांची परीक्षा २० ऑक्टोबरपासून  सुरू होत आहे. यात विद्यार्थ्यांना नव्या हॉल तिकीटवर यूझर आयडी, पासवर्ड दिले आहे. ऑफलाईन, ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीच्या परीक्षांसाठी हे हॉल तिकीट ग्राह्य धरण्यात येईल, अशी माहिती परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांनी रविवारी दिली. ते परीक्षांसंदर्भात पालक, विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बोलत होते. 
परीक्षांमध्ये तांत्रिक अडचणी उद्भवू नये, यासाठी नेमलेल्या एजन्सीकडून त्या दूर करण्यात आल्याची ग्वाही देशमुख यांनी दिली. दरम्यान १७ ऑक्टोबरपासून विद्यार्थ्यांचे ‘मॉक ड्रिल’ घेण्यात येत आहे. ४ ते ५ या वेळेत बी.ए., बी.कॉम., तर ५ ते ६ या वेळेत इतर अभ्यासक्रमांचे लोड टेस्ट तपासल्याचे त्यांनी सांगितले. जुने हॉल तिकीट ग्राह्य धरले जाणार नाही, १२ ते १९ ऑक्टोबरपर्यंतच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून, २० ऑक्टोबरपासूनचे वेळापत्रक कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक महाविद्यालयात हॉल तिकीट पोहोचले आहे. तूर्त हॉल तिकीटमध्ये त्रुटी, चुका असल्याबाबत कोणतीही तक्रार नाही, असेही देशमुख म्हणाले. विद्यार्थ्यांना रविवारी हॉल तिकीट मिळावे, यासाठी महाविद्यालये सुरू ठेवण्यात आली आहेत. चार शिफ्टमध्ये परीक्षा होणार असून, सकाळी ८ ते ९.३० वाजता बी.ए., व बी.फार्म. अभ्यासक्रमांचे पेपर घेण्यात येतील. उर्वरित अभ्यासक्रमांचे पेपर पूर्वीच्या वेळापत्रकानुसार घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. २० ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर दरम्यान परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. या परीक्षेत ओटीपी आणि मोबाईल क्रमांक रद्द करण्यात आले आहे. 

सीईटीसोबत विद्यापीठ परीक्षाही देता येईल
२१ ऑक्टोबर रोजी सीईटीचा पेपर आहे. मात्र, याच दिवशी विद्यापीठाचे पेपर असल्यास दिवसभरात कधीही सीईटीचा पेपर सोडविल्यानंतर विद्यार्थी हे पेपर सोडवू शकतील, अशी मुभा देण्यात आली आहे. केवळ विद्यार्थ्यांना व्हॉट्सअँपवर सीईटीचे हॉल तिकीट टाकावे लागेल. सकाळी ८ ते सायंकाळी ५.३० या वेळेत केव्हाही विद्यापीठाची परीक्षा देता येईल, असे देशमुख म्हणाले.

दीड तासांची असेल ऑफलाईन परीक्षा 
विद्यापीठ अंतर्गत ३८६ महाविद्यालयांमध्ये ऑफलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. ५,५०० हजार विद्यार्थी परीक्षार्थी असल्याची यादी प्राप्त झाली आहे. ऑफलाईन परीक्षेसाठी प्रत्येक केंद्रावर केंद्राधिकारी नेमण्यात आले आहेत. त्यांना स्वतंत्र पासवर्ड दिला असून, तो गोपनीय ठेवावा लागणार आहे. ऑफलाईन परीक्षा सोडविताना एचबी पेन्सील, खोड रबर, पेन सोबत ठेवावा लागणार आहे. २० ऑक्टोबर रोजी पहिल्या दिवशी २५० पेपर घेण्यात येणार आहे. ऑफलाईन परीक्षेसाठी केंद्रावर पीडीएफ फाईल मिळेल. ती विद्यार्थ्यांना प्रिन्ट काढून द्यायची आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करावे लागणार आहे.

 

Web Title: User ID, password only on new hall ticket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.