पशुपक्ष्यांवर होतोय विषाक्त धान्याचा वापर
By Admin | Updated: June 21, 2014 23:46 IST2014-06-21T23:46:33+5:302014-06-21T23:46:33+5:30
जंगलानजीक असलेल्या शेतांमध्ये वन्यप्राणी व पशुपक्ष्यांचा हैदोेस वाढला आहे. तो थांबविण्यासाठी शेतात विषाक्त धान्य पसरविण्याचा फंडा अमरावती शहराजवळील इंदला जंगलाशेजारचे शेतकरी व शिकारी वापरत

पशुपक्ष्यांवर होतोय विषाक्त धान्याचा वापर
वैभव बाबरेकर - अमरावती
जंगलानजीक असलेल्या शेतांमध्ये वन्यप्राणी व पशुपक्ष्यांचा हैदोेस वाढला आहे. तो थांबविण्यासाठी शेतात विषाक्त धान्य पसरविण्याचा फंडा अमरावती शहराजवळील इंदला जंगलाशेजारचे शेतकरी व शिकारी वापरत असल्याची माहिती गुप्तहेरांकडून मिळाल्याने वन विभाग खडबडून जागा झाला आहे.
इंदला जंगलानजीक अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन आहे. शेतात डौलात असलेल्या पिकांची वन्यपशू व पक्षी नासाडी करीत असल्यामुळे या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकरी शेतांमध्ये चक्क विषाक्त धान्य पसरवून अनेक पक्ष्यांना यमसदनी पोहोचवीत असल्याची माहिती आहे. हा प्रकार वेळीच थांबावा यासाठी वन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले असून संशयितांचा शोध घेतला जात आहे.
आतापर्यंत जंगलातील वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी जाळे, फासे व विषाक्त पाण्याचा वापर केला जात असे. मात्र, आता या पद्धतीत बदल झाल्याचे दिसते. विषाक्त पाण्यात कडधान्ये भिजवून पक्ष्यांसमोर पसरविले जाते. असे दान्य खाण्यात आल्याने कित्येक पक्ष्यांचा बळी गेला आहे. पशूदेखील मृत्युमुखी पडले आहेत. शेतकरी स्वत:च्या शेतातील पिकांचे रक्षण करण्यासाठी हा फंडा वापरतात. तर शिकाऱ्यांनी पशु-पक्ष्यांच्या शिकारीसाठी या नवा मार्गाचा अवलंब केला आहे.
वडाळी वनपरिक्षेत्रातील इंदला गावाजवळ अनेक शेतशिवार आहेत. विषाक्त कडधान्य पसरवून पशू-पक्ष्यांची शिकार होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी पी.के. लाकडे व त्यांच्या चमूने फ्रेजरपुरा पोलिसांसह इंदला भागातील संशयास्पद शेतशिवारांची पाहणी केली. यावेळी धक्कादायक परिस्थिती वन विभागाच्या निदर्शनास आली. एका शेतशिवारातील कुटाराजवळ पसरलेले कडधान्य विषाक्त असल्याचे आढळून आले. मात्र, हे धान्य कोणी टाकले याबाबत शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.