मेळघाट कुपोषणमुक्तीसाठी टॅबलेट, स्मार्ट फोनचा वापर
By Admin | Updated: May 20, 2016 00:06 IST2016-05-20T00:06:42+5:302016-05-20T00:06:42+5:30
कुपोषणासाठी कुप्रसिद्ध असलेल्या मेळघाटातून कुपोषण हद्दपार व्हावे, यासाठी अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिकांना टॅबलेट, स्मार्ट फोन वितरीत केले जाणार आहेत.

मेळघाट कुपोषणमुक्तीसाठी टॅबलेट, स्मार्ट फोनचा वापर
महिला,बालकल्याण विभाग : अंगणवाडी सेविकांसोबत सुलभ होणार संवाद
लोकमत विशेष
अमरावती : कुपोषणासाठी कुप्रसिद्ध असलेल्या मेळघाटातून कुपोषण हद्दपार व्हावे, यासाठी अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिकांना टॅबलेट, स्मार्ट फोन वितरीत केले जाणार आहेत. हा प्रयोग राज्यातील २० जिल्ह्यांमध्ये राबविला जात आहे.
मेळघाटात पावसाळ्यात कुपोषण मोठ्या प्रमाणात डोके वर काढते. हा दरवर्षीचा अनुभव असला तरी यावेळी शासनाने महिला आणि बालकांच्या आरोग्याविषयी काळजी घेण्यासाठी वर्ल्ड बँक आणि टाटा ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक उत्तरदायित्व निधीतून टॅबलेट, स्मार्ट फोनचा वापर करण्याचे ठरविले आहे. मेळघाटातील दऱ्याखोऱ्यांमध्ये वास्तव्यास असलेल्या आदिवासी महिला आणि बालकांची काळजी घेण्यासाठी हायटेक यंत्रणा वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कुपोषणाने कोणीही महिला अथवा बालक दगावू नये, ही काळजी आता महिला व बालकल्याण विभागाने घेतली आहे. अंगणवाड्यांमध्ये बालकांना दिला जाणारा आहार, महिलांना पोषण, बालकांचे लसिकरण आदी माहिती आता टॅबलेट, स्मार्ट फोनच्या माध्यमातून शासनाला कळणार आहे. ‘आयसीडीएस कॉमन सॉफ्टवेअर’ या नावाने यासाठी अॅप्लिकेशन तयार करण्यात आले असून टॅबलेट आणि स्मार्ट फोन त्याचेशी जोडले जाईल. अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिकांना स्मार्ट फोन, टॅबलेट हाताळण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षण आटोपताच जुलैपासून कुपोषणमुक्तीसाठीच्या सूचना, माहिती आणि देवाणघेवाण आदींबाबतची इत्यंभूत माहिती आता अंगवाडी सेविका, पर्यवेक्षिकांना स्मार्ट फोन, टॅबलेटद्वारेच द्यावी लागणार आहे. यासंपूर्ण उपक्रमाचे नियोजन वर्ल्ड बँक, टाटा ट्रस्टकडे राहणार आहे. मेळघाट व्यतिरिक्त नागपूर, हिंगोली, वाशीम, मुंबई, जालना, परभणी, सांगली, ठाणे, नवी मुंबई, गडचिरोली आदी भागांचाही या उपक्रमामध्ये समावेश करण्यात आला आहे.
अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षणाचा अभाव
धारणी, चिखलदरा तालुक्यातील अंगणवाड्यांची फारच विदारक अवस्था आहे. काही अंगणवाड्या या अतिदुर्गम भागात असून टॅबलेट, स्मार्ट फोन हाताळण्यासाठी ‘कनेक्टिव्हिटी’ची मोठी अडचण येणार आहे. एकीकडे अंगणवाडी सेविकांना संगणक हाताळता येत नाहीत, हे वास्तव आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिकांना टॅबलेट, स्मार्ट फोन हाताळण्याचे सूक्ष्म प्रशिक्षण हाच एकमेव पर्याय आहे.
दर दिवसाचा आढावा घेणार
अंगणवाड्यांमधून महिला आणि बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आहार, पोषण आदीविषयी माहिती टॅबलेट, स्मार्ट फोनच्या माध्यमातून दरदिवसाला घेतली जाणार आहे. कुपोषणमुक्तीसाठी ‘सॅम, मॅम’मध्ये बदल झाला अथवा नाही, हे अंगणवाडी सेविका अथवा पर्यवेक्षिकांकडून घेतली जाणार आहे.
मेळघाटात ब्रिटानिया न्युट्रीशन फांऊडेशनच्यावतीने सॅम, मॅम अंतर्गत बालकांची आॅनलाईन तपासणी सुरु आहे. वर्ल्ड बँक आणि टाटा ट्रस्टद्वारे सुरु होणाऱ्या पोषण चळवळीचा निर्णय प्राप्त झाला नाही.
- कैलास घोडके. महिला, बालकल्याण अधिकारी