गडगा प्रकल्पात चोरीच्या रेतीचा वापर

By Admin | Updated: June 28, 2015 00:36 IST2015-06-28T00:36:46+5:302015-06-28T00:36:46+5:30

गडगा मध्यम सिंचन प्रकल्पात विनारायेल्टी २२५ ब्रास रेतीचा अवैध साठा येथील एसडीओ व्ही.के. राठोड यांनी पकडला व पंचनामा

The use of stolen sands in the Gadga project | गडगा प्रकल्पात चोरीच्या रेतीचा वापर

गडगा प्रकल्पात चोरीच्या रेतीचा वापर

२२५ ब्रास वाळूचा अवैध साठा : ३७ लाख रूपये दंड होण्याची शक्यता
राजेश मालवीय धारणी
गडगा मध्यम सिंचन प्रकल्पात विनारायेल्टी २२५ ब्रास रेतीचा अवैध साठा येथील एसडीओ व्ही.के. राठोड यांनी पकडला व पंचनामा करून संबंधित पाटबंधारे अधिकारी व कंत्राटदाराला धारणीची अधिकृत रॉयल्टी पास सादर करण्याचे सांगितले आहे, अन्यथा शासकीय महसूल गौणखनीज अधिनियमानुसार प्रति ब्रासप्रमाणे ३७ लाख रुपयांचा दंड संबंधित कंत्राटदारावर आकारले जाण्याचे संकेत आहे.
पाटबंधारे विभाग अमरावती अंतर्गत धारणी तालुक्यात बिजुधावडी येथे १२९ कोटींच्या व सध्या १८० कोटी वाढीव किमतीच्या गडगा मध्यम प्रकल्पात मातीमिश्रित अवैधरीत्या रेती वापरली जात असल्याची माहिती एसडीओ व्ही.के. राठोड यांना कळताच त्यांनी तहसीलदार पुरूषोत्तम भुसारी यांना सोबत घेऊन गडगा प्रकल्पावर धाड टाकली. यात २२५ ब्रास विनारॉयल्टीचा अवैध रेतीसाठा आढळला. एसडीओंनी रॉयल्टी मागितली, मात्र उपस्थितांनी रॉयल्टी नसल्याचे सांगत रेतीचा पंचनामा करून तत्काळ अधिकृत रॉयल्टी सादर करण्याचे सांगितले. अन्यथा महसूल गौण खनीज अधिनियमानुसार १६,८०० रूपये प्रतिब्रासप्रमाणे दंड आकारण्यात येईल, असे ठणकावून सांगताच लाखो रूपयांच्या दंडात्मक कारवाईच्या धास्तीने संबंधित कंत्राटदाराच्या जवळच्या अभियंत्याने म.प्र. ४५ कि. मी. वरून रेती आणल्याचे काही रॉयल्टी पास उशिरा एसडीओंकडे सादर केल्याने शंका निर्माण झाली आहे. गडगा प्रकल्पापासून धारणीच्या सोनाबर्डी रेती खदानीचे अंतर २५ कि. मी. आहे. मग मध्यप्रदेशातून ४५ कि. मी. अंतरावरून रेती आणण्याचे कारण काय, या सर्व बाबींचा तपास एसडीओ राठोड करीत असून पूर्ण चौकशीअंती ३७ लाखांच्या दंडात्मक कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.

अचलपूर कार्यालयातून चालतो कारभार
अमरावती पाटबंधारे विभागाचे धारणी येथे उपविभागीय कार्यालय असतानाही आर्थिक लालसेपायी नवीन लहान पाटबंधारे उपविभाग अचलपूर येथून अभियंता व उप. वि. अभियंता हे कारभार चालवीत आहे. १८० कोटींच्या गडगा प्रकल्पावर १२५ कि.मी. अंतरावरुन कारभार पूर्णत: रामभरोसे सुरू असून लाखो रूपयांची कामे न करताच कंत्राटदाराला आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी मोजमाप पुस्तिकेवर अभियंता खोट्या नोंदी घेऊन लाखो देयके आणि प्रवास भत्ता काढून शासनाला आर्थिक फटका नुकसान पोहोचवीत आहे.
कंत्राटदारावर होऊ शकते ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई
अवैध रेतीसाठा करणाऱ्यांवर १२ जून २०१५ च्या गौण खनीज कायद्यांतर्गत सक्तीची कारवाई करण्याचे शासन आदेश आहे. त्यानुसार गडगा प्रकल्पावरील रेती ही विनारॉयल्टीची असल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित एफ. ए. कंस्ट्रक्शन कंपनीवर एम.पी.डी.ए. अंतर्गत कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाल्यास महसूल प्रशासन संबंंिधत कंत्राटदाराजवळून सुमारे ३७ लाख रुपये दंड आकारण्याची कारवाई करु शकते. त्यामुळे आता याप्रकरणात संबंधित कंत्राटदारावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शासकीय किंवा गैरशासकीय कामात अवैध रेतीचा वापर करणाऱ्यांविरुद्ध गौण खनिज कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल. तसेच गडगा प्रकल्पाच्या अवैध रेतीसाठ्यामध्ये कंत्राटदारासोबत पाटबंधारे विभागाचे अभियंता सहभागी असेल तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल.
- किरण गित्ते,
जिल्हाधिकारी, अमरावती.

Web Title: The use of stolen sands in the Gadga project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.