मुदतीबाह्य औषधाचा वापर; चिमुकली गंभीर, पीएससीत ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 06:00 IST2019-09-19T06:00:00+5:302019-09-19T06:00:55+5:30
कार्यरत वैद्यकीय अधिकारी गीतांजली लखदिवे यांनी तिची तपासणी केली. तिला त्यानी काही गोळ्या व लॅक्टुलोज नामक पोट साफ होण्याकरिता सीलबंद औषध दिले. चिमुकलीला घरी औषध पाजण्यात आले. त्यामुळे तिची प्रकृती आणखी बिघडली.

मुदतीबाह्य औषधाचा वापर; चिमुकली गंभीर, पीएससीत ठिय्या
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : तालुक्यातील साद्राबाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सहा वर्षे वयाच्या चिमुकलीला वैद्यकीय अधिकाऱ्याने मुदतबाह्य औषध दिले. चिमुकलीची प्रकृती गंभीर झाल्यानंतर खासगी रुग्णालयात उपचार घेताना हा धक्कादायक प्रकार पुढे आला. सदर चिमुकली थोडक्यात वाचली. संतप्त गावकऱ्यांनी जाब विचारण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात बुधवारी दुपारी ठिय्या दिला. त्यानंतर पोलिसांत तक्रार देण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार, लाकटू गावातील रहिवासी चिमुकली गुंजन राजेंद्र पवार या चिमुकलीच्या पोटात दुखत असल्याने आईवडिलांनी तिला शनिवारी उपचाराकरिता साद्राबाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले होते. तेथे कार्यरत वैद्यकीय अधिकारी गीतांजली लखदिवे यांनी तिची तपासणी केली. तिला त्यानी काही गोळ्या व लॅक्टुलोज नामक पोट साफ होण्याकरिता सीलबंद औषध दिले. चिमुकलीला घरी औषध पाजण्यात आले. त्यामुळे तिची प्रकृती आणखी बिघडली.
तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट
तालुका वैद्यकीय अधिकारी शशिकांत पवार यांना सदर प्रकरण कळताच तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. गावकऱ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु, सरपंच लक्ष्मीबाई पटेल, अनिल पटेल, सचिन पटेल, राजन सोनीसह गावकऱ्यांनी डॉ. गीतांजली लखदिवे यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी लावून धरली.
‘त्या’ चिमुकलीवर मी उपचार केला नाही. डॉ. जाधव यांनी तिच्यावर उपचार केला. औषधवाटप फार्मसिस्टचे काम आहे. त्यांनी औषध तपासून वितरित करणे गरजेचे होते.
- डॉ. गीतांजली लखदिवे