मालमत्ता फेरफारात बनावट सहीशिक्क्यांचा वापर
By Admin | Updated: December 31, 2014 23:18 IST2014-12-31T23:18:05+5:302014-12-31T23:18:05+5:30
चांदूरबाजार तहसील अंतर्गत येणाऱ्या एका मालमत्तेसंदर्भात बनावट सही शिक्यांनी फेरफार पत्रक करुन फसवणूक केल्याचे सिध्द झाले. मात्र कारवाईत दिरंगाई केली जात आहे.

मालमत्ता फेरफारात बनावट सहीशिक्क्यांचा वापर
अमरावती : चांदूरबाजार तहसील अंतर्गत येणाऱ्या एका मालमत्तेसंदर्भात बनावट सही शिक्यांनी फेरफार पत्रक करुन फसवणूक केल्याचे सिध्द झाले. मात्र कारवाईत दिरंगाई केली जात आहे. याप्रकरणी जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दोषी, अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे. मात्र अद्याप कोणताही कारवाई करण्यात न आल्याने तक्रारकर्ते न्यायासाठी भटकंती करीत आहेत.
चांदूरबाजार येथील रहिवासी माणीकसा नारायणसा पवार यांचे वॉर्ड क्रंमाक १२ (मालमत्ता क्रमांक ११०) मध्ये घर आहे. या मालमत्तेची चांदूरबाजार तहसील कार्यालयात नोंद आहे. हे त्यांच्या मालकीचे घर असतानाही विजय गोपाळसा पवार, सुरेश गोपाळसा पवार व अन्य पाच जणांनी माणिकसा पवार यांच्या मालमत्ता कागदपत्रावर खोटे शिक्के व स्वाक्षरी करुन फेरफार केले. मालमत्ता स्वत:च्या नावाची नोंद करुन घेतली. ही बाब माणीकसा पवार यांच्या निदर्शनास येताच त्यांनी मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधला, मात्र त्यांनी माहिती दडपण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे माणिकसा पवार यांचा मुलगा लक्ष्मण माणिक पवार यांनी राज्य माहिती आयुक्तांकडे अपील केली. राज्य माहिती आयोगाच्या चौकशीतूनसुध्दा नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्याला तंतोतंत खरी व वस्तनिष्ठ माहिती देण्याचे आदेश देण्यात आले होते.
तसेच नुकसान भरपाई म्हणून तीन हजार रुपये देण्याचे माहिती आयोगाने कळविले होते. मात्र अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे चांदूरबाजार नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी प्रकरण दडपण्याचे प्रयत्न केल्याचे आढळून आले आहे. (प्रतिनिधी)