उर्ध्व वर्धा, सपन, पूर्णा फुल्ल
By Admin | Updated: August 2, 2016 00:07 IST2016-08-02T00:07:42+5:302016-08-02T00:07:42+5:30
यंदा सरासरीपेक्षा अधिक व धरणक्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने पूर्णा व सपन प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले त..

उर्ध्व वर्धा, सपन, पूर्णा फुल्ल
तीन प्रकल्पांची दारे उघडली : ८२ प्रकल्पांमध्ये ८०.३८ टक्के जलसाठा
अमरावती : यंदा सरासरीपेक्षा अधिक व धरणक्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने पूर्णा व सपन प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले तर मध्यप्रदेशातून पाण्याची आवक (येवा) वाढल्याने उध्व वर्धा धरणाचे सर्वच १३ दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा ईशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
जिल्ह्यात ८२ प्रकल्प आहेत. यामध्ये एकूण प्रकल्पित संकलित ९०५ दलघमी पातळीच्या तुलनेत १ आॅगस्ट रोजी ७२७.५२ दलघमी जलसाठा शिल्लक आहे. ही टक्केवारी ८०.३८ इतकी आहे. शहानूर प्रकल्पात ४६.४ संकल्पित जलसाठ्याच्या तुलनेत सद्यस्थितीत ३३.०२ दलघमी जलसाठा आहे. ही टक्केवारी ७१.७२ इतकी आहे. चंद्रभागा प्रकल्पात संकल्पित साठ्याच्या तुलनेत सध्या २१.७२ दलघमी जलसाठा आहे. तर सपन प्रकल्पात ३८.६० संकल्पित जलसाठ्याच्या तुलनेत २६.६५ दलघमी जलसाठा आहे. ही टक्केवारी ६९.०४ इतकी आहे.
मागील २४ तासांत १८.७ मिमी पाऊस पडला. सर्वाधिक ५१ मिमी पाऊस नांदगाव तालुक्यात पडला. या तालुक्यात लोणी व माहुली (चोर) या महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. अमरावती १० मिमी, भातकुली ४.८ मिमी, चांदूररेल्वे २३.६, धामणगाव ४, तिवसा १६, मोर्शी १९.२, वरूड २.४, अचलपूर २०.२, चांदूरबाजार ५, दर्यापूर २९.६, अंजनगाव सुर्जी २८, धारणी ११.४ व चिखलदरा तालुक्यात ३७.२ मिमी पाऊस पडला. १ जून ते १ आॅगस्ट या कालावधीत जिल्ह्यात ४२९.५ मिमी पाऊस अपेक्षित असताना सद्यस्थितीत ६५०.८ मिमी पाऊस पडला. ही टक्केवारी १५१.५ टक्केवारी आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत हा पाऊस ७९९.९ टक्के आहे.
उध्ववर्धाचे १३ दरवाजे उघडले
मध्यप्रदेशातून पाण्याची आवक वाढल्याने धरणात ८० टक्के साठा झाला आहे. धरणाच्या सुरक्षेचा उपाय म्हणून सोमवारी सकाळी १० वाजता १३ दरवाजे ५० सेमीने उघडण्यात आलेत. यामधून १०३० घनमिटर प्रती सेंकदनुसार पाण्याचा विसर्ग होत आहे.
१५ कुटूंबांना हलविले
मोर्शी तालुक्यात चारघड नदीला पूर आल्यामुळे उमरखेड गावातील ३ घरात पाणी शिरले. याच नदीच्या पुरामुळे घाटलाडकी व बेलमंडळी या गावांचा संपर्क शनिवारी तुटला होता व गावातील घरांमध्ये पाणी शिरले. अशा एकूण १५ कुटूंबांना सुरक्षित स्थळी हलविले आहे.काही घरांची पडझड झाली आहे.
मोर्शी येथील दमयंती नदीला आलेल्या पुरात येथील आशुब मेहबुब पठाण हा १२ वर्षांचा मुलगा वाहून गेला. शोध व बचाव पथकाद्वारा त्याचा शोध घेणे सुरू आहे.