जिल्हा सामान्य रुग्णालयात अद्ययावत नेत्र शस्त्रक्रियागृह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:13 IST2021-04-27T04:13:47+5:302021-04-27T04:13:47+5:30

अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयात अद्ययावत, सर्व सुविधांनी सज्ज व नूतन नेत्र शस्त्रक्रियागृहाची निर्मिती करण्यात आली असून, ...

Updated Eye Surgery at District General Hospital | जिल्हा सामान्य रुग्णालयात अद्ययावत नेत्र शस्त्रक्रियागृह

जिल्हा सामान्य रुग्णालयात अद्ययावत नेत्र शस्त्रक्रियागृह

अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयात अद्ययावत, सर्व सुविधांनी सज्ज व नूतन नेत्र शस्त्रक्रियागृहाची निर्मिती करण्यात आली असून, १ एप्रिलपासून शस्त्रक्रियांनाही सुरुवात झाली आहे. आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी इतरही सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सोमवारी येथे केले.

इर्विन रुग्णालयातील नेत्र शस्त्रक्रियागृहाचे मॉड्युलर ओ.टी.मध्ये रूपांतरण झाले असून, १ एप्रिलपासून शस्त्रक्रियेचे कार्य पूर्ववत सुरू झाले आहे. मागील वर्षी ही इमारत निर्माणाधीन स्थितीत असल्यामुळे हा विभाग तात्पुरत्या स्वरूपात बडनेरा येथील ट्रामा केअर सेटर युनिट येथे स्थानांतरित करण्यात आला होता. या दरम्यान रुग्णांना तेथे जाऊन शस्त्रक्रिया करून घ्यावी लागत असे. तेथे मोठ्या संख्येत रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी परवानगी नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत असे. मात्र, आता नूतन शस्त्रक्रियागृहात अद्ययावत वैद्यकीय उपकरणे, शस्त्रक्रियेदरम्यान व नंतर घेण्यात येणारी काळजी, रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या सर्व सुविधांचा लाभ रुग्णांना घेता येणार आहे.

नवीन अद्ययावत उपकरणे

नेत्र शस्त्रक्रियागृह अद्ययावत असावे, तिथे सर्व यंत्रणा उपलब्ध असावी, यासाठी पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजनातून निधी उपलब्ध करून दिला. त्यानुसार मायक्रोस्कोप, आय बँकेसाठी लागणारी सगळी नवीन अद्ययावत उपकरणे तिथे उपलब्ध करण्यात आली. जिल्ह्यातील इतर रुग्णालयांतील सुविधा वाढविण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले असून, विविध कामांना चालना मिळाली आहे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

-----------

गुंतागुंतीच्या नेत्र शस्त्रक्रिया करणे शक्य

अद्ययावत उपकरणांच्या उपलब्धतेमुळे अत्यंत क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या नेत्र शस्त्रक्रिया इर्विनमध्ये करता येणे आता शक्य होणार आहे. दृष्टिहीन अंध रुग्णांना दृष्टी प्रदान करण्यासाठी आवश्यक ती शस्त्रक्रिया, योग्य औषधोपचार आणि नेत्र आरोग्यासंबंधी वैद्यकीय सुविधा तिथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले.

---

राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत अंध बांधवांना दृष्टिदानाचा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमासाठी येथील अद्ययावत सुविधांचा मोठा लाभ होणार आहे. कोरोनाकाळातही जिल्ह्यातील आसपासच्या तालुक्यातील रुग्ण अमरावती येथे येऊन शस्त्रक्रियेच्या माध्यमातून दृष्टी प्राप्त करून घेत आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयातील अद्ययावत आणि वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज असलेल्या या नेत्र शस्त्रक्रियागृहाचा जिल्ह्यातील गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम व नेत्र शल्यचिकित्सक नम्रता सोनोने यांनी केले.

Web Title: Updated Eye Surgery at District General Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.