अचलपुरात अवकाळी पाऊस, गारपिटीचा ४३ गावांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:13 IST2021-03-23T04:13:59+5:302021-03-23T04:13:59+5:30
गहू हरभरा कांदा झोपला, संत्रा जमिनीवर, केळीचे नुकसान परतवाडा : अवकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीने अचलपूर तालुक्यातील ...

अचलपुरात अवकाळी पाऊस, गारपिटीचा ४३ गावांना फटका
गहू हरभरा कांदा झोपला, संत्रा जमिनीवर, केळीचे नुकसान
परतवाडा : अवकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीने अचलपूर तालुक्यातील तब्बल ४३ गावांमधील शेतकऱ्यांना फटका बसला आहे. गहू, संत्रा, कांदा, हरभरा, केळी या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सोमवारी अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त काही भागांचा दौरा केला.
१९ आणि २० मार्च रोजी अचलपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. त्यामध्ये शेतात उभ्या पिकांसह संत्र्याच्या आंबिया बहराला फटका बसला. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक अहवालानुसार, ५८८ हेक्टरमधील गहू, ९४.३० हेक्टर कांदा, तीन हेक्टर हरभरा, तर फळपिकांत २ हजार ९०० हेक्टरमधील संत्री, ५५ हेक्टरमधील केळी या पिकांचे नुकसान झाले आहे. सोमवारी मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल, तहसीलदार मदन जाधव, जिल्हा परिषद सदस्य प्रताप अभ्यंकर, तालुका कृषी अधिकारी प्रफुल्ल सातव यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी धामणगाव गढी, एकलासपूर आदी भागांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे आढळून आले. त्यानुसार तात्काळ सर्वेक्षण करून शासनाला अहवाल पाठविण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे सोमवारपासून प्रत्यक्ष सर्वेक्षणाला सुरुवात झाली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी प्रफुल्ल सातव यांनी दिली.
बॉक्स
रबी पिकांचे सर्वाधिक नुकसान
अचलपूर व मेळघाट विधानसभा मतदारसंघ अंतर्गत अचलपूर तालुक्यातील अनेक गावांचा नुकसानग्रस्तांच्या यादीत समावेश आहे. चमक खुर्द, चमक बुद्रुक, सुरवाडा, चाचोंडी, देवरी, खांबोरा, तुळजापूर जहागीर, नायगाव, कविठा खुर्द, धामणगाव गढी, देवगाव, पिंपळखुटा, बोपापूर, निमदरी, एकलासपूर, धोतरखेडा, सालेपूर, कोठारा, वडुरा, बेलखेडा, पांढरी, निमखेडा, मल्हारा, म्हसोना, गौरखेडा कुंभी, औरंगपूर, काळवीट, बुरुडघाट, चौसाळा खोजपुर, खानापूर, बिलखेडा आदी जवळपास ४७ गावांत पिकांचे नुकसान झाले आहे.
कोट
अचलपूर तालुक्यातील जवळपास ४७ गावांना अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका बसला. गहू, संत्रा, हरभरा, केळी, कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे.
प्रफुल्ल सातव, तालुका कृषी अधिकारी, अचलपूर
पान ३ चे लिड