शासनाचा कोट्यवधींचा महसूल पाण्यात
चांदूरबाजार : रेती उत्खननाचे सर्व नियम धाब्यावर बसवून तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. रेती तस्करीबाबत समाजसेवकांनी उपविभागीय अधिकारी म्हस्के व तहसीलदारांकडे आणि स्थानिक पोलीस विभागाकडे अनेकदा तक्रारी करूनही रेती तस्करांवर थातूरमातूर कारवाई केली जात आहे. एकाच कंत्राटदाराच्या नावाने कोदोरी व शिरजगाव कसबा येथील रेती घाटाचा लिलाव घेण्यात आला. परंतु नेमून दिलेल्या ठिकाणातून रेतीची उचल न करता कुरळपूर्णा नदीतून रेतीची तस्करी सुरू आहे. याला आवर घालण्यासाठी संबंधित तलाठ्याने केविलवाणा प्रयत्न केला असला तरी वरिष्ठांकडून रेती माफियांना अभय दिला जात आहे. रेती उत्खनन करीत असताना काही नियम ठरवून दिलेले आहेत.
परंतु पैशासमोर नियम गळून पडले. सूर्यास्तानंतर रेतीची वाहतूक करता येत नसताना रात्री बेरात्री लिलाव न झालेल्या ठिकाणावरून रेतीची तस्करी सुरू आहे. उत्खनन करताना किती खोल उत्खनन करून रेती काढावी याचेही नियम ठरवून दिलेले असताना मोठमोठे खड्डे करून रेतीचा उपसा सुरू आहे. वाळूमाफियांवर कारवाई करण्याकरिता संबंधित तलाठ्यांनी पथक नेमण्याची मागणी वरिष्ठांकडे केली आहे. परंतु रेती माफियांकडून लाखो रूपये महसूल अधिकारी, तालुका प्रशासनाचे प्रमुख व पोलीस विभागाचे अधिकारी घेत असल्याने त्यांचे हात बांधले गेले आहे.
त्यामुळे सर्व नियम धाब्यावर बसवून रेतीची तस्करी सुरू आहे. रेती तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. कोणत्याही प्रकारची कुरळपूर्णा नदीपात्रातील रेतीचा हर्रास न होता या नदीपात्रातून रेतीची अवैध वाहतूक होत असतानाही तहसील प्रशासनाचे अधिकारी मूग गिळून का बसले आहे, असा प्रश्न जनतेसमोर निर्माण झाला आहे. (तालुका प्रतिनिधी)