शहरात अनिर्बंध अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2016 00:17 IST2016-07-06T00:17:34+5:302016-07-06T00:17:34+5:30
अमरावती शहरात महापालिकेच्या नाकावर टिचून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे.

शहरात अनिर्बंध अतिक्रमण
महापालिकेला जुमानेनात व्यापारी, हॉकर्स : आयुक्तांचे दुर्लक्ष
संदीप मानकर अमरावती
अमरावती शहरात महापालिकेच्या नाकावर टिचून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. महापालिकेची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असून हे अतिक्रमण शहराच्या सौंदर्यीकरणाच्या दुष्टीने अडचणीचे ठरत आहे.
महापालिका येथील व्यावसायिकांवर कारवाई करते. परंतु पुन्हा अतिक्रमण 'जेसै थे' होत आहे. कायमस्वरुपी अतिक्रमणाचा मुद्दा निकाली निघत नसल्याने संपूर्ण शहरच अतिक्रमणाच्या विळख्यात आहे. यामुळे वाहतुकीला प्रचंड अडथळा निर्माण होत असून अमरावती शहरातील मुख्य चौकातही अतिक्रमण स्थापन झाले आहे. या अतिक्रमणाला पोलिसांचे व महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे अभय असल्यानेच कारवाई होत नाही. याकडे शहरातील लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष आहे. होऊ घातलेल्या महापालिकेच्या निवडणुकीसाठी अनेकांची मोर्चेबांधणी सुरूझाली आहे. मतदार राजाला दुखवायचे नाही म्हणून तेसुद्धा अतिक्रमणाच्या मुद्याकडे कानाडोळा करीत असल्याचे दिसते.
वाढत्या अतिक्रमणांमुळे नागरिकांचीही डोकेदुखी वाढली आहे. शहरात बकाल वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या अतिक्रणाचा मुद्या लक्षात घेता गुरुवारी 'लोकमत'ने सर्वेक्षण केले. यामध्ये राजकमल चौक, ते गांधी चौक, इर्विन चौक ते रेल्वे स्टेशन चौकात राजापेठ आदी मार्ग अतिक्रमणाच्या विळाख्यात सापडला आहे. महानगरपालिकेने काही दिवसांपूर्वी रेल्वे स्टेशन मार्गावरील फुटपाथवरील अतिक्रमण काढले होते. पण आता पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली आहे. येथील श्याम चौकातील फुटपाथ व्यावसायिकांनी गडप केले आहे. राजापेठजवळ वाहतुक ीची कोंडी होत आहे. येथील चित्रा टॉकीजजवळ अनेक पाणटपऱ्या व नाश्त्याच्या दुकानांनी रस्ते गडप केले आहे. प्रभात टॉकीजजवळ रस्त्यावर बेवारसपणे आॅटो उभे करून वाहतुकीला अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण फोफावले असताना महापालिकेचे आयुक्त हेंमत पवार गप्प का, असा प्रश्न चर्चीला जात आहे. शहरात बहुतांश चौकांत लाकडी फलका, खोके, टाकून ही जागा हॉकर्सनी बळाकावली आहे. फुटपाथवरून चालण्याचा पहिला हक्क हा नागरिकांचा असतो, असे धडे वाहतूक पोलीस विभागाकडूनच देण्यात येतात. मात्र प्रत्यक्षात स्थिती वेगळी दिसून येते.
इर्र्विन रुग्णालय ते रेल्वेस्टेशन चौक
इर्विन रुग्णालय ते रेल्वेस्टेशन चौक मार्गावरील फुटपाथ पुन्हा अनेक व्यावसायिकांनी गडप केला आहे. येथील गॅरेज चालकांनी शो- रूमच्या संचालकांनी येथे दुचाकी व इतर साहित्य ठेवून अतिक्रमण केले आहेत. या मार्गावर महापालिकेने कारवाई करावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
राजकमल ते गांधी चौक
या मार्गावर अनेक व्यावसायिकांनी क पडे विक्री, लहान मुलांचे खेळणे, चप्पल विक्री व कपड्यांच्या विक्रीची दुकाने थाटली आहेत. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
जोशी मार्केट
ते प्रभात चौकात गर्दी
जोशी मार्केट ते प्रभात चौकात प्रचंड अतिक्रमण करण्यात आले आहे. व्यावससायिकांना महापालिकेने व्यवसाय करण्यासाठी तीन फुटापर्यंत जागा दिली असताना जास्त जागेचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे. येथे अनेक फेरीवाल्यांनी हातगाड्या रस्त्यावरच थाटल्या आहेत.
राजापेठ चौक
येथे रघुवीर रेफ्रेशमेंटजवळ, बाजूच्या परिसरात फुटपाथवर अवैध पार्किंग होत आहे. बाजूलाच राजापेठ पोलीस ठाणे आहे. चौकात नेहमीच वाहतुकीची कोंडी निर्माण होते.
शहरातील अतिक्रमणाला जबाबदार कोण ?
अतिक्रमण कमी व्हायला हवे का ? कारवाई करणे योग्य की अयोग्य ? असेल तर का, कोणते अडथळे निर्माण होतात? पर्याय का? आणि शहर कसे आहे? आदी प्रश्न 'लोकमत'च्या प्रतिनिधीने मुलाखतीव्दारे विचारले असता ३० नागरिकांनी यामध्ये लोकप्रतिनिधींना दोषी ठरविले आहे. २५ नागरिकांनी अतिक्रमणे काढा, असे सांगितले आहे. या मागील कारणे देताना हॉकर्स, किरक ोळ दुकानदारांना जागा उपलब्ध करून द्या, असे सांगितले गेले. १० लोकांनी अशाप्रकारे कारवाई करुन त्यांचा रोजगार हिरावून घेतला जात आहे, असे सांगितले. अशाप्रकारे नागरिकांनी आपले मत व्यक्त केले.
अतिक्रमणे म्हणजे काय ? : शहरातील सार्वजनिकस्थळी विनापरवाना कोणताही उद्योग अथवा व्यवसाय थाटणे म्हणजे अतिक्रमण होय.
फिरते व्यवसाय : रस्त्यावर पाल टाकून, हातगाडी लावून, टोपली रस्त्यावर ठेवून वाहनात विक्रीचे साहित्य सजवून फिरत्या स्वरुपाचे व्यवसाय सुरू आहे.