प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामात गैरप्रकार
By Admin | Updated: August 25, 2015 00:31 IST2015-08-25T00:31:27+5:302015-08-25T00:31:27+5:30
पर्यावरण व महसूल विभागाची शासकीय परवानगी न घेता एका कंस्ट्रक्शन कंपनीच्या कंत्राटदाराने मांडवा येथे पाच महिन्यांपासून अवैधरीत्या बोगस हॉटमिक्स प्लांट टाकून...

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामात गैरप्रकार
करबुडव्या कंत्राटदाराला अभय कुणाचे?: बोगस हॉटमिक्स प्लांट
राजेश मालवीय धारणी
पर्यावरण व महसूल विभागाची शासकीय परवानगी न घेता एका कंस्ट्रक्शन कंपनीच्या कंत्राटदाराने मांडवा येथे पाच महिन्यांपासून अवैधरीत्या बोगस हॉटमिक्स प्लांट टाकून त्याआधारे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत लाखो रूपयांच्या डांबरी रस्त्यांची कामे केलीत. शासनाचा हजारो रूपयांचा महसूल कर बुडविणाऱ्या या कंत्राटदाराचे शासकीय कंत्राट रद्द करून कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
धारणीपासून ५ कि.मी. अंतरावरील मांडवा सिंचन तलावलगत चव्हाण यांचे शेत आहे. सदर शेत हे भोगवटदार वर्ग २ व मीनईअंतर्गत येत असून ती शासकीय जागा आहे. जागेची खरेदी-विक्री करता येत नाही. मात्र हरीदर्शन कंस्ट्रक्शन कंपनीच्या कंत्राटदाराने सदर शेताची कोणतीही खरेदी न करता आणि ग्रामपंचायत मांडवा, महसूल विभाग, पर्यावरण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगररचना, खनीकर्म विभाग इत्यादी शासकीय कार्यालयांची ना हरकत परवानगी न घेताच शेतमालकाशी संगनमत करून तेथे अवैधरीत्या बोगस हॉट मिक्स प्लांट पाच महिन्यांपूर्वी सुरू केला. त्याआधारे कंत्राटदाराने प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील लाखो रूपयांच्या डांबरी रस्त्याची कामे केली आहेत. मात्र पाच महिन्यांपासून अवैध सुरू असलेल्या हॉटमिक्स प्लांट व कंत्राटदारावर मांडवा ग्रामपंचायत सचिव व तलाठी, मंडळ अधिकारी यांनी कारवाई केली नाही. दिवसाढवळ्या महसूल विभागासह इतर विभागांची दिशाभूल करून महसूल कर बुडविणाऱ्या हरीदर्शन कंस्ट्रक्शन कंपनीचे शर्मा नामक कंत्राटदारावर ही बोगस कामे कोणाच्या आशीर्वादाने व विना परवानगीने करीत आहे, याची चौकशी होणे गरजेचे आहे. हॉट मिक्स प्लांट टाकणाऱ्या कंत्राटदाराचे शासकीय कंत्राट रद्द करून कंस्ट्रक्शन कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी होत आहे. याप्रकरणी कंत्राटदाराशी माहितीसाठी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.
कंत्राटदाराकडे एनओसी नाही
हॉटमिक्ससाठी सर्वप्रथम शेत खरेदी, नगररचना विभागाकडून अकृषक, महसूल विभाग, ग्रामपंचायत पर्यावरण, सामाजिक बांधकाम विभाग, खनिकर्म इत्यादींची परवानगी आवश्यक आहे. मात्र मांडवा येथे उभारलेल्या हॉटमिक्स प्लांटला वरील पैकी एकही शासकीय विभागाची एनओसी नसतानाही बिनधास्तपणे पाच महिन्यांपासून अवैध प्लांट सुरू आहे, हे विशेष.
मांडवा येथील अवैध हॉटमिक्स प्लांटबद्दल संबंधित कंत्राटदाराला नोटीस दिली आहे. याप्रकरणी एसडीओचा अहवाल आल्यानंतर योग्य ती कडक कार्यवाही केली जाईल.
- किरण गित्ते,
जिल्हाधिकारी, अमरावती.