विघ्नहर्त्याच्या आगमनासाठी अंबानगरी सज्ज
By Admin | Updated: August 28, 2014 23:27 IST2014-08-28T23:27:53+5:302014-08-28T23:27:53+5:30
एकंदत, वक्रतुंड, गजानन, विघ्नहर्ता, लंबोदर, गणेश अशा अनेक नावांनी भावणारा ‘गणपती’ वर्षभराच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आज येतोय. गेल्या वर्षी बाप्पाला निरोप देताना ‘पुढच्या वर्षी लवकर या’ची

विघ्नहर्त्याच्या आगमनासाठी अंबानगरी सज्ज
अमरावती : एकंदत, वक्रतुंड, गजानन, विघ्नहर्ता, लंबोदर, गणेश अशा अनेक नावांनी भावणारा ‘गणपती’ वर्षभराच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आज येतोय. गेल्या वर्षी बाप्पाला निरोप देताना ‘पुढच्या वर्षी लवकर या’ची घातलेली गळ आता कुठे फळतेय. शुक्रवारी गणेश चतुर्थी. थाटामाटात, वाजतगाजत, ढोल-ताशांच्या गजरात विघ्नहर्त्याची स्वारी विराजमान होईल. त्यासाठी शहर सज्ज झाले आहे. घरोघरी गणेशाच्या आगमनाची जय्यत तयारी झाली आहे. शुक्रवारच्या पहाटेपासून तर संपूर्ण दिवसभर बाप्पाच्या प्रतिष्ठापनेचा शुभमुहूर्त असल्याने भक्तांना यथावकाश बाप्पांची प्रतिष्ठापना करता येईल.
शहरातील ४६० तर ग्रामीण भागातील ७०४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांद्वारे गणेशाची स्थापना करण्यात येईल. महागाई आणि कोरड्या दुष्काळाच्या सावटातही शहरात गणेशचतुर्थीनिमित्त उत्साह संचारलेला दिसून येत आहे. शहरातील राजापेठ, राजकमल चौक, नंदा मार्केट, नेहरू मैदान, यशोदानगर, गोपालनगर, एमआयडीसी, कठोरा नाका येथे गणपतींच्या रेखीव सुबक मूर्तींसाठी खास बाजारपेठ भरते. विघ्ननाशकाला घरी नेण्यासाठी येथे कुटुंबासह नागरिकांची गर्दी उसळते. ४०० रूपयांपासून गणेश मूर्ती बाजारात उपलब्ध आहेत. पीओपीच्या मुर्तींच्या तुलनेत शाडूच्या मातीपासून बनलेल्या मूर्ती खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढतो आहे. परंतु या मूर्ती प्लास्टिक आॅफ पॅरीसच्या मुर्तीच्या तुलनेत महाग असल्याने प्लास्टर आॅफ पॅरीसच्या मूर्र्तींचा खपही कमी झालेला नाही. महापालिकेने गणेश स्थापनेसाठी २६८ मंडळांना एनओसी दिली आहे.
अनेक ठिकाणी कलावंत मूर्तींवर शेवटचा हात फिरवत आहेत. सजावटीच्या साहित्याने बाजारपेठ सजली असून पॅकिंग पेपर, मूर्र्तीच्या मागे वेगात भिरभिरणारे चक्र, जिलेटींग, घंट्या, पडदे, थर्माकोलच्या आकर्षक वस्तू, लायटिंग, इलेक्ट्रॉनिक मेणबत्त्या, फ्लोटिंग कँडल्सचे प्रकार बाजारात आहेत. गणेश स्थापनेचा मुहूर्त जवळ आला तरी बाजारातील उत्साह, लगबग तसुभरही कमी झालेली नाही.