विद्यापीठाचे ‘नॅक’ कोरोनामुळे लांबले, एसएसआर झाला तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:12 IST2021-03-19T04:12:43+5:302021-03-19T04:12:43+5:30
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद (नॅक) कोरोनामुळे लांबले आहे. विद्यापीठाने ‘नॅक’चा ‘अ’ श्रेणी ...

विद्यापीठाचे ‘नॅक’ कोरोनामुळे लांबले, एसएसआर झाला तयार
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद (नॅक) कोरोनामुळे लांबले आहे. विद्यापीठाने ‘नॅक’चा ‘अ’ श्रेणी दर्जा प्राप्त करण्यासाठी सेल्फ स्डटी रिपोर्ट (एसएसआर) तयार केला आहे. साधारणत: मे महिन्यात विद्यापीठात ‘नॅक’चे मूल्यांकन होईल, असे संकेत आहेत.
दर पाच वर्षांनी महाविद्यालय, विद्यापीठांना ‘नॅक’ मूल्यांकन बंधनकारक आहे. त्याकरिता केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाच्या चमुकडून हे मूल्यांकन केले जाते. तत्पूर्वी शैक्षणिक संस्थांना दिल्ली येथे केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाकडे ऑनलाईन एसएसआर पाठवावा लागतो. मात्र, मार्च २०२० पासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला आणि आजतागायत तो कायम आहे. त्यामुळे अमरावती विद्यापीठाचे डिसेंबर २०२० मध्ये होणारे ‘नॅक’ मूल्यांकन होऊ शकले नाही. फेब्रुवारीपासून विद्यापीठात अधिकारी, कर्मचारी संक्रमित आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ‘नॅक’ मूल्यांकनाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या तयारीत आडकाठी आली आहे. असे असले तरी मोजक्याच कर्मचाऱ्यांच्या भरवशावर विद्यापीठाने ‘नॅक’चे एसएसआर तयार केले आहे. हा एसएसआर ‘नॅक’कडे पाठविला जाणार आहे. त्यानंतर ‘नॅक’कडून एसएसआरची पडताळणी (डीडीव्ही) होणार असून, मूल्यांकनासाठी विद्यापीठाला तारीख देण्यात येईल, असा ‘नॅक’ मूल्यांकनाचा प्रवास आहे.
विद्यापीठाचे ‘नॅक’ मूल्यांकन हे कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या कार्यकाळात होईल, अशी तयारी सुरू आहे. कुलगुरू चांदेकर यांच्या कार्यकाळ जूनमध्ये संपुष्टात येणार आहे.
-------------
कोरोना काळातही काम सुरू
विद्यापीठात ‘नॅक’ मूल्यांकनाचे कामकाज सुरळीतपणे होण्यासाठी कोरोना काळातही कर्मचारी कार्यरत आहेत. विविध विभागातून माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. ‘नॅक’ने डाक्युमेंट, झिरो टॅग फोटोग्राफी फाईलींवर भर दिला आहे. त्याअनुषंगाने वेगवेगळे विभाग, प्रशासकीय माहिती गोळा करण्याला वेग आला आहे.
-----------
विद्यापीठाचे ‘नॅक’मूल्यांकन मे महिन्यात होईल. एसएसआरची तयारी झाली ही महत्वाची बाब आहे. आता हा अहवाल ‘नॅक’कडे पाठविला जाणार आहे. साधारणत: मे महिन्यात नॅक’चे मूल्यांकन होईल, असे संकेत आहे.
- अविनाश माेहरील, अधिष्ठाता, अमरावती विद्यापीठ.