The university withheld the results; Huge crowd of students | विद्यापीठाने निकाल रोखले; विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी

विद्यापीठाने निकाल रोखले; विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी

ठळक मुद्देजुन्या सत्राच्या गुणपत्रिकांची तारांबळ, अंतिम वर्षाचा निकाल जाहीर तरीही गुणपत्रिका नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने जुन्या सत्राच्या गुणपत्रिका अप्राप्त असल्याने अशा विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाचे निकाल रोखले आहेत. त्यामुळे गत दोन ते तीन दिवसांपासून जुन्या सत्राच्या गुणपत्रिका जमा करण्यासाठी प्रचंड गर्दी होत आहे. महाविद्यालयात गुणपत्रिका जमा करूनही त्या विद्यापीठात पोहचविल्या नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये रोष आहे.
ऑनलाईन परीक्षा देऊन निकाल जाहीर झाला, पण गुणपत्रिका नाही, यामुळे विद्यार्थी गोंधळून गेले आहेत. गुणपत्रिका का आल्या नाहीत, अशी विचारणा करण्यासाठी विद्यार्थी महाविद्यालयात पोहोचत असताना, त्यांना विद्यापीठात जाण्याचा सल्ला दिला जात आहे. गुणपत्रिका जमा करूनही महाविद्यालयांनी त्या विद्यापीठाला दिल्या नाहीत. याविषयात दरदिवशी हजाराहून अधिक विद्यार्थी विद्यापीठात गर्दी करीत आहेत. काही महाविद्यालयांनी पदव्युत्तर प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. अशात गुणपत्रिका न मिळाल्याने विद्यार्थी हैराण झाले आहेत.
जुन्या सत्राच्या गुणपत्रिका जमा झाल्याशिवाय अंतिम सत्राचा निकाल जाहीर करता येत नाही. महाविद्यालयांनीच गुणपत्रिका जमा करणे अपेक्षित होते. आता विद्यार्थी स्वत: गुणपत्रिका आणून देत असून, निकाल जाहीर केला जात आहे.
- हेमंत देशमुख, संचालक 
परीक्षा व मूल्यांकन मंडळ

चृूक महाविद्यालयाची आहे. मात्र, निकाल जाहीर झाल्यानंतरही गुणपत्रिकांसाठी पायपीट करावी लागत आहे. १२० कि.मी.चा प्रवास करून विद्यापीठात यावे लागले. वेळेत गुणपत्रिका मिळाली, तरच पदव्युत्तर प्रवेश मिळेल.
- प्रियंका मराठे, खामगाव.

Web Title: The university withheld the results; Huge crowd of students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.