विद्यापीठ कुशल मनुष्यबळ निर्माण करणार
By Admin | Updated: August 6, 2016 00:08 IST2016-08-06T00:08:09+5:302016-08-06T00:08:09+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात शॉर्ट टर्म अभ्यासक्रम सुरु करून कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी पुढाकार घेईल,...

विद्यापीठ कुशल मनुष्यबळ निर्माण करणार
कुलगुरुंचे प्रतिपादन : भारत, जपानच्या विद्यार्थ्यांची कार्यशाळा
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात शॉर्ट टर्म अभ्यासक्रम सुरु करून कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी पुढाकार घेईल, असे प्रतिपादन कुलगुरु मुरलीधर चांदेकर यांनी मंगळवारी व्यक्त केले.
विद्यापीठाच्या डॉ.के.जी.देशमुख सभागृहात ‘सेतू- स्ट्रेंड रिलेशन्स बिटविन इंडिया अॅण्ड जपान’ या थीमवर आधारित ‘भारत व जपान येथील विद्यार्थी आणि उद्योजकांसाठी असलेल्या संधी’ याविषयावर आयोजित कार्यशाळेचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कुलसचिव अजय देशमुख, एमबीए विभागप्रमुख संतोष सदार, प्रमुख अतिथी म्हणून जपानचे नैकी माकिनो, इसमू कोयमा, सुसूके मिझुनो आणि आरियोशी नामी, रासेयो समन्वयक गणेश मालटे, प्रौढे निरंतर शिक्षण आणि विस्तारसेवा विभागाचे संचालक श्रीकांत पाटील, महाव्यवस्थापक उदय पुरी उपस्थित होते. आपल्या भागातील विद्यार्थ्यांमध्ये कुशल कामगार घडवून त्यांना जपान येथील रोजगाराच्या संधी मिळाव्यात, या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या प्रौढ निरंतर शिक्षण आणि विस्तारसेवा विभागाच्यावतीने प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
इसमू कोयमा म्हणाले, जपानमधील अनेक कंपन्या भारतात आल्या आहेत आणि भविष्यात येणार आहेत. भारतात इतर देशांच्या तुलनेत कमी पगारामध्ये दर्जेदार मनुष्यबळ उपलब्ध होते. त्यामुळे भारताला प्राधान्य दिले जाते. सन २०२० पर्यंत भारतात सर्वात जास्त कुशल मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. १२०९ जपानी कंपन्यांची २०१४ पर्यंत भारतात नोंदणी केली आहे. मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या भारतात सर्वात जास्त आहे. स्टार्ट-अप इंडियामध्ये जपान, अमेरिका व इतर देशांच्या कंपन्या भारतात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करीत असून भारतीयांना रोजगारांच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांनी त्यासाठी कठोर परिश्रम व कौशल्य वाढविण्याची गरज आहे. भारतीय विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान व कौशल्य आत्मसात करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. प्रास्ताविक श्रीकांत पाटील संचालन माधुरी दिवरे यांनी केले. (प्रतिनिधी)