विद्यापीठाच्या पीएच.डी. कोर्स परीक्षा केव्हा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:11 IST2020-12-29T04:11:19+5:302020-12-29T04:11:19+5:30
एआयएसएफचा सवाल, प्र-कुलगुरूंना भेटले शिष्टमंडळ अमरावती :संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात प्रलंबित असलेली पीएच.डी. कोर्स वर्क परीक्षा तात्काळ घेऊन संशोधक ...

विद्यापीठाच्या पीएच.डी. कोर्स परीक्षा केव्हा?
एआयएसएफचा सवाल, प्र-कुलगुरूंना भेटले शिष्टमंडळ
अमरावती :संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात प्रलंबित असलेली पीएच.डी. कोर्स वर्क परीक्षा तात्काळ घेऊन संशोधक विद्यार्थ्यांना न्याय प्रदान करावा, अशी मागणी एआयएसएफने केली आहे. प्र-कुलगुरू
राजेश जयपूरकर यांना सोमवारी शिष्टमंडळाने भेट घेऊन पीएच.डी. संशोधकांचे प्रश्न अवगत केले.
एआयएसएफचे जिल्हा सचिव योगेश चव्हाण यांच्या नेतृत्वात निवेदन सादर करण्यात आले. कोरोना महामारीमुळे विद्यापीठाने कोणत्याही परीक्षा घेतल्या नाहीत. परंतु, आता विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार नवीन शैक्षणिक वर्ष चालू झाले आहे. पीएच.डी.करिता आवश्यक असलेली पात्रता परीक्षा (पेट) उत्तीर्ण केली असून, त्यानंतर विद्यापीठाने निर्देशित केलेल्या सूचनेनुसार कोर्स वर्क पूर्ण केला आहे. कोर्स वर्कनंतर प्रलंबित असलेली परीक्षा अजूनही विद्यापीठाने घेतली नाही. त्यामुळे पीएच.डी.चे विदयार्थी संभ्रमात आहेत. जेआरएफच्या विद्यार्थ्यांची फेलोशिप परीक्षा न झाल्यामुळे व त्या वेळेत रजिस्ट्रेशन न होऊ शकल्यामुळे विद्यार्थी फेलोशिप मिळण्यापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे प्रशासनाने या बाबत तात्काळ ठोस पाऊल उचलावे, असे एआयएसएफने निवेदनातून म्हटले आहे. यावेळी विजय भारती, कार्तिक पुरी, अब्दुल रहेमान खान, सलीम खान, पूजा गुल्हाने, मंजूश्री बारबुद्धे, वनिता राऊत, राजेश आडे आदी विद्यार्थी उपस्थित होते.