कर्मचाऱ्यांच्या योगदानातून विद्यापीठ मोठे झाले
By Admin | Updated: July 8, 2016 00:12 IST2016-07-08T00:12:46+5:302016-07-08T00:12:46+5:30
कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाशी ऋणानुबंध ठेवून दीर्घकाळ सेवा दिली. संस्था मोठी करण्यासाठी परिश्रम घेतले.

कर्मचाऱ्यांच्या योगदानातून विद्यापीठ मोठे झाले
कुलगुरू : कर्मचाऱ्यांचे विशेष योगदान
अमरावती : कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाशी ऋणानुबंध ठेवून दीर्घकाळ सेवा दिली. संस्था मोठी करण्यासाठी परिश्रम घेतले. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या योगदानातूनच विद्यापीठ मोठे झाल्याचे मत कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी व्यक्त केले.
विद्यापीठातील गणित विभागाचे प्रमुख किशोर अढाव, परीक्षा विभागातील सहायक कुलसचिव अशोक वानखेडे, वरिष्ठ सहायक च.ना. तागडे व दै.वे.विठ्ठल मावळे यांचा सेवानिवृत्तीप्रसंगी कुलगुरूंनी त्यांचा सत्कार केला. त्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर कुलसचिव अजय देशमुख, परीक्षा नियंत्रक जे.डी. वडते, अढाव, वानखेडे, तागडे, कर्मचारी संघाचे अध्यक्ष अजय देशमुख व जनसंपर्क अधिकारी विलास नांदुरकर उपस्थित होते.
डी.एसस्सी. मानाची पदवी विद्यापीठाने दिल्याबद्दल त्यांनी सर्वांप्रती ऋण व्यक्त केले. अशोक वानखेडे म्हणाले, मी विद्यापीठाची प्रामाणिकपणे सेवा केली. त्यामुळे मला समाजातही सन्मान मिळाला. परीक्षा विभागाला कर्मचारी उपलब्ध करून देण्याबाबत विद्यापीठ प्रशासनाने लक्ष द्यावे, असे सुचक वक्तव्य तागडे त्यांनी केले. विठ्ठलराव मावळे यांनी काम करताना सर्वांचे सहकार्य व मार्गदर्शन मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
सुरूवातीला विद्यापीठ गीताचे सादरीकरण करण्यात आले. कुलसचिव अजय देशमुख, परीक्षा नियंत्रक जे.डी. वडते, आस्थापना विभागातील अधीक्षक मोहन लोमटे यांनी मान्यवरांचे रोपटे देऊन स्वागत केले. प्रास्तविक कुलसचिव अजय देशमुख व परीक्षा नियंत्रक जे.डी. वडते यांनी केले. पतसंस्थेचे अध्यक्ष दीपक काळे यांनी कर्मचारी कल्याण निधीचा धनादेश व पुस्तक सत्कारमूर्तीला सुपूर्द केला. संचालन जनसंपर्क अधिकारी विलास नांदुरकर यांनी, आभार प्रदर्शन अजय देशमुख यांनी केले.
यावेळी शशीकांत आस्वले माजी कुलगुरू विलास सपकाळ, माजी प्र-कुलगुरू जयकिरण तिडके, अधिष्ठाता मनोज तायडे, माजी कुलसचिव दिनेशकुमार जोशी, माजी परीक्षा नियंत्रक भि.र. वाघमारे, माजी व्यवस्थापन परिषद सदस्य प्रवीण रघुवंशी, अमरसिंह राठोड, विद्यापीठाच्या विविध विभागांचे विभाग प्रमुख, शिक्षक, अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. ( प्रतिनिधी)