विद्यापीठ, महाविद्यालयांना सॅनिटायझर, हँडवॉशचा विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 06:00 IST2020-03-14T06:00:00+5:302020-03-14T06:00:49+5:30
उच्च शिक्षण सहसंचालक केशव तुपे यांनी यूजीसीकडून कोरोना विषाणूसंदर्भात आलेली गाईडलाईन सर्वच महाविद्यालयांसह विद्यापीठांना पाठविली. अंमलबजावणीच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी महाविद्यालये, विद्यापीठात वॉशरूम, कार्यालयीन स्टॉप, शिक्षक वृंदाच्या बैठकीच्या ठिकाणी सॅनिटायझर, हँडवॉश किंवा साबण ठेवण्यात आले नव्हते.

विद्यापीठ, महाविद्यालयांना सॅनिटायझर, हँडवॉशचा विसर
गणेश वासनिक ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नोव्हेल कोरोना विषाणूपासून सतर्कता बाळगण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. तथापि, या गाइड लाइनला विद्यापीठ व महाविद्यालयांनी हरताळ फासल्याचे वास्तव शुक्रवारी ‘लोकमत’ चमूच्या निदर्शनास आले. चमूने भेट दिलेल्या महत्त्वाच्या ठिकाणी सॅनिटायझर, हँडवॉश किंवा साबण यांचा कुठेच पत्ता नव्हता.
उच्च शिक्षण सहसंचालक केशव तुपे यांनी यूजीसीकडून कोरोना विषाणूसंदर्भात आलेली गाईडलाईन सर्वच महाविद्यालयांसह विद्यापीठांना पाठविली. अंमलबजावणीच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी महाविद्यालये, विद्यापीठात वॉशरूम, कार्यालयीन स्टॉप, शिक्षक वृंदाच्या बैठकीच्या ठिकाणी सॅनिटायझर, हँडवॉश किंवा साबण ठेवण्यात आले नव्हते. केवळ नोटीस बोर्डवर कोरोना विषाणूपासून काळजी घेण्याबाबत सूचना लावून सर्वांनी हात झटकल्याचे निदर्शनास आले. केशरबाई लाहोटी महाविद्यालयात उत्तम स्वच्छता होती; मात्र सॅनिटायझर, हँडवॉश किंवा साबणाचा पत्ता नव्हता. हात वारंवार धुणे हा कोरोनाला दूर ठेवण्याचा उपाय महाविद्यालयांनी गांभीर्याने घेतलेला नसल्याचे वास्तव आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रशासकीय, शिक्षण विभागातही हीच अनास्था अनुभवास आली.
परीक्षा व मूल्यांकन विभागातील एकाही कक्षात कर्मचाऱ्यांची आरोग्याच्या काळजी वाहणाºया उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या. विद्यापीठ अंतर्गत ३९४ महाविद्यालयांना गाइड लाइन पाठविण्यात आल्या, हे विशेष.
या महाविद्यालयांची
केली पाहणी
ब्रजलाल बियाणी महाविद्यालय
महिला महाविद्यालय, इर्विन चौक
केशरबाई लाहोटी महाविद्यालय
विद्याभारती महाविद्यालय
शिवाजी विज्ञान महाविद्यालय
उच्च शिक्षण संचालकांच्या निर्देशांनुसार महाविद्यालये, विद्यापीठांना यूजीसीच्या गाइड लाइन वितरित केल्या आहेत. विद्यार्थी, कर्मचारी, शिक्षकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी उपाययोजनांचे निर्देश दिलेत.
- केशव तुपे
सहसंचालक, उच्च शिक्षण