जिल्हाधिकारी कार्यालयातील बेशिस्त वाहने हटविली
By Admin | Updated: June 2, 2016 01:47 IST2016-06-02T01:47:15+5:302016-06-02T01:47:15+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयात राजरोसपणे वाहने नको त्या ठिकाणी ठेवली जात होती. या संदर्भात मंगळवारच्या अंकात लोकमतने वृत्त प्रकाशित करताच बेशिस्त वाहने .......

जिल्हाधिकारी कार्यालयातील बेशिस्त वाहने हटविली
सूचना फलक लागले : नियम पाळा अन्यथा वाहनांमधील हवा सोडू!
अमरावती : जिल्हाधिकारी कार्यालयात राजरोसपणे वाहने नको त्या ठिकाणी ठेवली जात होती. या संदर्भात मंगळवारच्या अंकात लोकमतने वृत्त प्रकाशित करताच बेशिस्त वाहने लावणाऱ्यांची दखल खुद्द जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांनी घेतली असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आत अधिकाऱ्यांच्या दालनांपर्यंत वाहने जात असतील तर वाहनांच्या चाकांमधील हवा सोडून कठोर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. या ठिकाणी वाहने न लावण्यासंदर्भात कलेक्ट्रेट परिसरात सूचना फलकही लावण्यात आले आहेत.
येथील जिल्हा नाझर कार्यालय, करमणूक शुल्क विभाग, अन्न-धान्य अधिकारी विभाग, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ कार्यालय व इतर विविध विभागांजवळ खुद्द जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकारीच त्यांची वाहने बेशिस्तपणे लावत होते. यामुळे वर्दळीला अडथळा निर्माण होत होता. परिसरात पार्किंगची अधिकृत व्यवस्था असताना कर्मचारी येथे वाहने कशी लावतात, असा प्रश्न उपस्थित होत होता. त्यामुळे स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकाराची दखल घेऊन मंगळवारी कर्मचाऱ्यांना ताकीद दिली आहे. यापुढे जर अधिकृत पार्किंग स्थळाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी वाहने आढळल्यास कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.
कार्यालयासमोरील वाहनांवरही कारवाई करा
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही नागरिक बेशिस्तपणे वाहने लावतात. त्यांच्यावर कारवाईचा बडगा जिल्हाधिकारी कधी उभारणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. येथे अधिकृत पार्किंग व नोपार्किंगचे फलकसुध्दा लावावेत. यानंतरही जर कुणी नोपार्किंगमध्ये व परिसरात कुठेही बेशिस्त पध्दतीने वाहने उभी करीत असेल तर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला पाहिजे, अशी लोकांची मागणी आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून संपूर्ण जिल्ह्याचा कारभार चालतो. हेच कार्यालय शिस्तीत नसेल तर इतर कार्यालयांनी काय आदर्श घ्यावा, असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बेशिस्त वाहन चालकांविरुध्द कारवाई करावी, अशी जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची मागणी आहे.