अनन्वित छळामुळे खचले होते रूपालीचे धैर्य!
By Admin | Updated: October 6, 2014 23:04 IST2014-10-06T23:04:56+5:302014-10-06T23:04:56+5:30
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील खोडगाव येथील विवाहिता रूपाली तुरखडे मृत्युप्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी रूपाली निघून गेलीय, तिच्या सासरच्या मंडळींनी पैशांसाठी तिचा काटा काढलाय,

अनन्वित छळामुळे खचले होते रूपालीचे धैर्य!
काकांचा टाहो : सासरच्यांना धडा शिकवाच!
अमरावती : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील खोडगाव येथील विवाहिता रूपाली तुरखडे मृत्युप्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी रूपाली निघून गेलीय, तिच्या सासरच्या मंडळींनी पैशांसाठी तिचा काटा काढलाय, हे सत्य पचविणे अद्यापही तिच्या माहेरच्या मंडळींना जड जात आहे. रूपालीवर लग्नापासून सात वर्षांत झालेले अन्याय आणि शारीरिक व मानसिक छळाचे दाखले देऊन रूपालीचे काका राजेंद्र लंगोटे यांनी तुरखडे कुटुंबीयांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
रूपालीचे काका राजेंद्र लंगोटे यांच्या म्हणण्यानुसार, लग्नानंतर रूपालीला कधीही माहेरी पाठविण्यात आले नाही. माहेरी आल्यानंतर अवघ्या दोन तासांत तिला परत नेले जात असे. त्यामुळे माहेरच्या मंडळींना रूपालीचा सहवास लाभतच नव्हता. इतकेच नव्हे तर रूपालीचा नवरा सतीश यानेसुध्दा कधीही सासरी मुक्काम केला नाही. लग्नाला सहा वर्षे उलटून गेल्यानंतर तिला अमरावतीला कधीच आणले नाही. यातून रूपालीवर किती जाचक बंधने होती, हे स्पष्ट होते, असे तिच्या काकांचे म्हणणे आहे.
सधन कुटुंबात असूनदेखील रूपालीला कधीही २०० रूपयांपेक्षा अधिक किमतीची साडी सासरी घेतली गेली नाही. घरातील इतर महिलांना मात्र मन मानेल तशा पध्दतीने खर्च करण्याची मुभा असताना रूपालीला तिच्या स्त्रीसुलभ इच्छा मारून जगावे लागत होते. माहेरून मिळालेल्या महागड्या साड्या वापरण्याचीदेखील तिला परवानगी नव्हती.
रूपाली गृहिणी असल्याने घरातील कामे करण्याचे तिचे कर्तव्य असले तरी एखाद्या मोलकरणीसारखे तिला राबवून घेतले जात होते, असे रूपालीचे काका राजेंद्र लंगोटे यांचे म्हणणे आहे. पहाटे पाच वाजता उठून कामाला लागणाऱ्या रूपालीची उशिरा रात्रीच अंथरूणाला पाठ टेकत असे. माहेरी फोन करून लहान बहीण, भाऊ, आई-वडिलांशी बोलण्याची परवानगीदेखील रूपालीला नव्हती.
रूपालीचा सर्वाधिक छळ तिची चुलत सासू चित्रा तुरखडे यांनी केल्याचा आरोपही रूपालीचे काका राजेंद्र तुरखडे यांनी केला आहे.