खारपानातील ५० हजार हेक्टर पीक पाण्याखाली
By Admin | Updated: September 8, 2014 23:28 IST2014-09-08T23:28:23+5:302014-09-08T23:28:23+5:30
जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीतून शेतकरी सावरला असताना गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या दमदार पावसामुळे तालुक्यातील खारपाणपट्ट्यातील अंदाजे ५० हजार हेक्टर क्षेत्रातील

खारपानातील ५० हजार हेक्टर पीक पाण्याखाली
संदीप मानकर - दर्यापूर
जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीतून शेतकरी सावरला असताना गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या दमदार पावसामुळे तालुक्यातील खारपाणपट्ट्यातील अंदाजे ५० हजार हेक्टर क्षेत्रातील पिके धोक्यात आली आहेत. शेतात पावसाचे पाणी साचले असून सोयाबीन व कपाशीचे पीक पिवळे पडत आहेत. नाजूक असलेल्या तुरीच्या पिकांची मुळे कुजत आहेत. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी संकटात सापडला आहे.
अमरावती, भातकुली, दर्यापूर, अचलपूर व अंजनगाव तालुक्यांचा काही भाग हा खारपाणपट्ट्यांचा आहे. येथे काळी जमीन असल्यामुळे येथील जमिनीला थोड्या मुरत्या पावसाची आवश्यकता असते. परंतु यंदा एकाच वेळी अतिवृष्टी झाल्यामुळे पिके धोक्यात आली आहेत. २० जुलै रोजी अतिवृष्टी झाली होती. एकाच दिवशी २४० मि.मी. पावसाची नोंद झाली. आधी जून महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे मुगाच्या पिकांची दुबार, तिबार पेरणी करून शेतकरी हवालदिल झाला होता. नंतर अतिवृष्टीने मुगाचे पीक गेले. शासकीय अहवालानुसार ५ हजार २६२ हेक्टरच्या नुकसानीचा सर्व्हे झाला होता. परंतु जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पुन्हा सर्वेक्षण करून ३ हजार ९०६ हेक्टर पिकांंचे नुकसान व नदीकाठची ४०० हेक्टर शेती खरडून गेल्याचा अहवाल पाठविण्यात आला. परंतु हा सर्वे चुकीचा असल्याची ओरड शेतकऱ्यांची असून नुकसानीचा आकडा हजारो हेक्टरचा आहे. परंतु उर्वरित पिके शेतकऱ्यांच्या तोंडाशी आली असताना पुन्हा पावसाने आठवडाभरापासून थैमान घातले.
७ सप्टेंबर रोजी ६८.६७ मि.मी. पाऊस कोसळला आहे. दोन दिवसांत ९० मि.मी. पावसाची नोंद आहे. ८ सप्टेंबरपर्यंत तालुक्यात ६२८.११ मि.मी. पाऊस झाला आहे.
खारपाणपट्ट्यातील शेतकऱ्यांनी १७ हजार ९३५ हेक्टरमध्ये मुगाचा पेरा केला होता. परंतु संपूर्ण पीक हातचे गेल्यामुळे शेतकऱ्यांनी सर्वाधिक कपाशीला पसंती देत कपाशीची २४ हजार ५०४ हेक्टरमध्ये पेरणी, सोयाबीन १७ हजार ९०१ हेक्टर, तूर व इतर १२ हजार ५६ हेक्टर असे एकूण ७२ हजार ३९६ हेक्टरमध्ये पेरणी केली आहे. परंतु दोन दिवसांपासून या परिसरात दमदार पाऊस झाल्यामुळे ५० हजार हेक्टर शेती पाण्याखाली आली आहे. अशीच परिस्थिती अमरावती व भातकुली तालुक्याची आहे. शेतीची कामे बंद असल्यामुळे कपाशी या पिकांवर मावा, तुडतुडे या रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे तर सोयाबीनच्या झाडांची पाने पिवळी पडू लागली आहे.