वीज कंपनीने लादली ग्राहकांवर अवाजवी बिले
By Admin | Updated: December 3, 2015 00:23 IST2015-12-03T00:23:41+5:302015-12-03T00:23:41+5:30
विद्युत वितरण कंपनीने अंजनगाव बारी परिसरातील १२ गावातील मिटरचे रिडिंग घेतल्यानंतरही दरमहा ग्राहकांना २५ ते ५० हजार रुपयांचे बिल दिले ...

वीज कंपनीने लादली ग्राहकांवर अवाजवी बिले
अन्याय : वाढीव बिले भरण्यास नागरिकांचा नकार, वीज कंपनीप्रती रोष
अंजनगाव बारी : विद्युत वितरण कंपनीने अंजनगाव बारी परिसरातील १२ गावातील मिटरचे रिडिंग घेतल्यानंतरही दरमहा ग्राहकांना २५ ते ५० हजार रुपयांचे बिल दिले जात असल्याने ग्राहक विद्युत कंपनीमुळे त्रस्त झाले आहेत. मीटरचे रिडिंग घेतल्यानंतर बिल आकारणी रिडींगप्रमाणे व्हायला पाहिजे. परंतु अंदाजे बिल आकारणी केली जाते. त्यामुळे ग्राहकांना विनाकारण भूर्दंड सोसावा लागतो. विद्युत वितरण कंपनीने रिडिंग प्रमाणे बिल द्यायला पाहिजे. परंतु यामध्ये इंधन खर्च ,मीटर भाडे बिलात आकारले जाते. परंतु ग्राहकांकडून आधीच मिटरचे पैसे कंपनी घेते. त्यानंतर मीटर भाडे का लावल्या जाते, असा प्रश्न ग्राहकांनी केला आहे. अंजनगाव बारी परिसरातील ६०० ग्राहकांना २५ हजार रुपयांचे बिल १७० ग्राहकांन, ५० हजार रुपयांचे बिल १ हजार ९९१ ग्राहकांना, २० हजार रुपयांचे बिल १५०० ग्राहकांना, १ हजार ते १ हजार ५०० रुपयांचे बील लादून आले आहे. जवळपास ३ हजार ग्राहकांना ६०० ते ७०० पर्यंतचे बिल आले आहे. तर ४० ग्राहकांना ७५ हजार ते १ लाखा पर्यंतच्या बिलाची आकारणी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून विद्युत वितरण कंपनीने ग्राहकांना लुटण्याचा सापाटा लावल्याने विद्युत कंपनीच्या विरोधी ग्राहकमंचामध्ये केस दाखल करणार असून अंजनगाव बारी परिसरातील १२ गावातील ग्राहक आक्रमक झाले आहेत. विद्युत बिलांमध्ये दुरुस्ती केली गेली तरच भरणार अन्यथा ग्राहकमंचाकडे तक्रार करण्याचा ईशारा ग्राहकांनी दिला आहे. वीज वितरण कंपनीने चुकीचे बिल न देता रिडींगप्रमाणे बिल देण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे.
येथील हनुमान मंदिरापासून विद्युत तारा लोंबकळल्यामुळे अपघात होऊ शकतो. अंजनगाव बारी हनुमान मंदिराच्या पोलपासून डॉक्टर हटवार यांचे घरापर्यंत पोलवरील विद्युत तारा ७ फूटांवर खाली आल्याने येणाऱ्या जाणाऱ्या बैल बंड्या व अन्य वाहनांना अपघात होऊ शकतो.
विद्युत वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्यांना दोन वेळा सूचना देऊनही पोलवरील लोंबकळलेले तार ओढले नसल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे. तब्बल तीन महिने उलटूनही दुरुस्ती केली गेली नाही. वीज वितरण कंपनीशी संबंधित अनेक तक्रारींचे निवारण झाले नसल्याने तारा जमिनीपासून सात फुटांवर आल्या आहेत. ग्राहकांकडून लाखो रूपयांची वीज बिल वसुली करणाऱ्या विद्युत कंपनीने आधी तक्रारींचा निपटारा करावा, अन्यथा आक्रमक पवित्रा घेऊ, असे ग्राहकांचे म्हणणे आहे.