कल्याणनगर येथील अनधिकृत बांधकाम पाडले
By Admin | Updated: May 15, 2015 00:00 IST2015-05-15T00:00:00+5:302015-05-15T00:00:00+5:30
पार्किंगची जागा गिळंकृत : १५ फूट जागेवर अतिरिक्त बांधकाम

कल्याणनगर येथील अनधिकृत बांधकाम पाडले
अमरावती : बांधकाम परवानगी घेतानाच्या नकाशात पार्किंगची जागा दर्शवून त्यानुसार बांधकाम न करणाऱ्या स्थानिक कल्याणनगर येथील अश्वजित राऊळकर यांच्या मालकीचे अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई गुरुवारी महापालिका पथकाने केली. अनधिकृत बांधकाम मालकाने स्वत: पाडावे, यासाठी आयुक्तांनी नोटीस बजावली होती, हे विशेष.
आयुक्त गुडेवार यांनी १० दिवसांपूर्वी चार अनधिकृत बांधकामधारकांना नोटीस बजावून हे बांधकाम त्यांनी स्वत: पाडावे, अशा सूचना नोटीसद्वारे केल्या होत्या. मात्र ११ दिवसांचा कालावधी लोटला असताना इमारत मालकांनी ते पाडण्याचे सौजन्य दाखविले नाही. परिणामी गुरुवारी आयुक्तांनी सहायक संचालक नगररचना अधिकाऱ्यांना बोलावून पहिल्या टप्प्यात कल्याणनगर येथील अश्वजित राऊळकर यांनी नियमबाह्य उभारलेल्या सदनिका वजा संकुलाचे अतिरिक्त बांधकाम पाडण्याचे आदेश निर्गमित केले. त्यानुसार एडीटीपी, अतिक्रमण विभाग आणि पोलिसांची चमू गुरुवारी दुपारी कल्याणनगर येथे दाखल झाली. बुलडोजर, पोलिसांचा फौजफाटा, कर्मचारी असा लवाजमा बघून परिसरातील नागरिकही अवाक् झालेत. राऊळकर यांनी संकुल वजा सदनिकेसाठी बांधकाम परवानगी घेताना मंजूर नकाशात १५ फुटांची जागा पार्किंगसाठी दर्शविली होती. परंतु प्रत्यक्षात बांधकाम करताना पार्किंगची जागा सोडण्यात आली नाही. या जागेवरच बांधकाम करण्यात आले. याबाबतची तक्रार काही नागरिकांनी आयुक्तांकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत आयुक्तांनी ‘सर्चिंग’ केले. यात चार इमारतींचे अनधिकृत बांधकाम केल्याचे दिसून आले. पहिल्या टप्प्यात राऊळकर यांचे अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई करण्यात आली. येत्या आठवड्यात उर्वरित नियमबाह्य इमारतींवर बुलडोजर चालण्याचे संकेत आहेत. राऊळकर यांनी तळमजल्यावर दुकाने तर वरच्या मजल्यावर सदनिका बांधली होती. त्यांनी पार्किंगच्या जागेवरही बांधकाम केल्याचे सिध्द झाले. त्यामुळे आयुक्त गुडेवार यांनी अनधिकृत बांधकाम पाडून कारवाईचा श्रीगणेशा केला. ही कारवाई करताना एडीटीपी सुरेंद्र कांबळे, अभियंता हेमंत महाजन, घनश्याम वाघाडे, अजय विंचुरकर, अतिक्रमण विभाग प्रमुख गणेश कुत्तरमारे यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)