टंकलेखनासाठी सवलत, कॉम्प्युटर कोर्ससाठी मात्र ठेंगा!
By Admin | Updated: June 25, 2015 00:11 IST2015-06-25T00:11:24+5:302015-06-25T00:11:24+5:30
राज्यात एसटी परिवहन महामंडळाचे ‘अच्छे दिन’ येण्याची आशा मावळली आहे. एसटी महामंडळाद्वारे सध्याच्या संगणक युगात ग्रामीण भागातील लाखो विद्यार्थ्यांना शहरात ....

टंकलेखनासाठी सवलत, कॉम्प्युटर कोर्ससाठी मात्र ठेंगा!
अजब धोरण : राज्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांना आर्थिक फटका
नरेंद्र जावरे अमरावती
राज्यात एसटी परिवहन महामंडळाचे ‘अच्छे दिन’ येण्याची आशा मावळली आहे. एसटी महामंडळाद्वारे सध्याच्या संगणक युगात ग्रामीण भागातील लाखो विद्यार्थ्यांना शहरात फक्त टायपिंग वर्गासाठी सवलत पास दिली जात असून संगणक प्रशिक्षणार्थ्यांना मात्र ठेंगा दाखविला जात असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
परिवहन महामंडळाकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी सवलतीची प्रवास पास दिली जाते. या पाससाठी सदर विद्यार्थी शहरी भागात किंवा विशिष्ट शाळेत शिक्षण घेत असल्याचे प्रमाणपत्र (बोनाफाईड) शाळा देते. तर मुलींसाठी मानव विकास संसाधन योजनेंतर्गत पूर्णत: मोफत प्रवास ाची सोय उपलब्ध आहे. राज्यभरातील ग्रामीणवजा आदिवासी भागात दहावी किंवा बारावीपर्यंतच्या शाळा-महाविद्यालये मोजक्याच ठिकाणी आहेत. या विद्यार्थ्यांना शहरी भागात किंवा नजीकच्या गावात शिक्षणासाठी ये-जा करावी लागते. त्यासाठी त्यांना महामंडळाकडून सवलतदराची पास दिली जाते. राज्यभरातील लाखो विद्यार्थी या योजनेचा फायदा घेतात. मात्र, ही सवलत केवळ टायपिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच लागू करण्यात आल्याने इतर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. संगणक प्रशिक्षणार्थ्यांनाही ही पास दिली जात नाही.
हा तर संगणक प्रशिक्षणार्थ्यांवर अन्याय
शालेय शिक्षणाप्रमाणेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी टार्यपिंग प्रशिक्षणाकरिता सुध्दा ‘एसटी’ प्रवासात सवलत दिली जाते. पूर्वी मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील विद्यार्थी टायपिंग वर्गासाठी शहरी भागात येत असत. परंतु अलीकडे टायपिंग प्रशिक्षण कालबाह्य होत आहे. तर दुसरीकडे संगणकीय प्रशिक्षण शासनानेही अनिवार्य केले आहे. आता विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल संगणक प्रशिक्षणाकडे आहे. मात्र, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या एसटी बसमध्ये संगणक प्रशिक्षणार्थी असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवासदरात सवलत न देता डबल घंटी मारली आहे. परिणामी राज्यभरातील लाखो गोरगरीब विद्यार्थ्यांना आर्थिक फटका बसत आहे. टायपिंगसाठी सवलतीची प्रवास पास देणाऱ्या शासनाने संगणक प्रशिक्षणार्थ्यांवरील अन्याय दूर करावा.
अपडेट महामंडळ
राज्य परिवहन महामंडळ संगणकीय युगात अपडेट करण्याचा प्रयत्न परिवहन खात्याचे मंत्री दिवाकर रावते करीत आहेत. बसमध्ये वाय-फाय सेवा मिळणार आहे. तिकिटाचे पंचिंग मशीन केव्हाचेच भंगारात गेले. नवे संगणकीय तिकीट यंत्र आले. मात्र, भंगार बसगाड्याच प्रवाशांंच्या नशिबात आहेत. चालक-वाहक मात्र मोबाईलमुळे अपटेड झाले. तपासणी अधिकाऱ्यांच्या वाहनाचा क्रमांक तत्काळ मिळत असल्याने चोरी पकडणे कठीण झाल्याचे वास्तव आहे.