यवतमाळातून यायचा, अमरावतीतील बाईक चोरून निघून जायचा; सराईतास अटक
By प्रदीप भाकरे | Updated: October 27, 2023 18:13 IST2023-10-27T18:08:07+5:302023-10-27T18:13:01+5:30
दोन दुचाकी जप्त, कोतवाली पोलिसांची यशस्वी

यवतमाळातून यायचा, अमरावतीतील बाईक चोरून निघून जायचा; सराईतास अटक
अमरावती : एका सराईत दुचाकी चोराला कोतवाली पोलिसांनी २७ ऑक्टोबर रोजी अटक केली. त्याने दोन गुन्ह्यांची कबुली दिली. त्यानुसार त्याच्याकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्यात. नारायण सुभाष राठोड (३६, रा. वाईइजारा, यवतमाळ) असे अटक करण्यात आलेल्या चोराचे नाव आहे.
प्रमोद पांडुरंग पाटेकर (४२) हे अंबादेवी मंदिरात दर्शनासाठी गेल्यावर त्यांनी आपली दुचाकी नमुना येथील पार्किंगच्या ठिकाणी उभी केली होती. ती दुचाकी लंपास करण्यात आली होती. तसेच टाकळी कानडा येथील रहिवासी धीरज राजेंद्र निंघोट (३२) यांची दुचाकी बसस्थानक परिसरातून चोरीला गेली होती. या प्रकरणी दोघांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास आरंभला.
तपासात दोन्ही गुन्ह्यांत नारायण राठोड याचा हाथ असल्याचे समोर आले. त्यानुसार त्याला अटक करून चौकशी करण्यात आली. चौकशीत त्याने दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली. त्यानुसार त्याच्याकडून दोन्ही दुचाकी जप्त करण्यात आल्यात. ही यशस्वी कारवाई कोतवालीचे ठाणेदार विजयकुमार वाकसे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश सपकाळ, दीपक श्रीवास, मंगेश दिघेकर, मोहम्मद समीर, सागर ठाकरे यांनी केली.