भिंत रंगरंगोटीला दोन, फाईल तयारीचे तीन हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:14 IST2021-09-21T04:14:13+5:302021-09-21T04:14:13+5:30
बेरोजगारांना मिळतोय रोजगार, दिवाळीसारखीच पीआरसी दौऱ्याची तयारी मोहन राऊत - धामणगाव रेल्वे : शाळा, आरोग्य केंद्र, उपकेंद्र, पशुचिकित्सालय, अंगणवाडी ...

भिंत रंगरंगोटीला दोन, फाईल तयारीचे तीन हजार
बेरोजगारांना मिळतोय रोजगार, दिवाळीसारखीच पीआरसी दौऱ्याची तयारी
मोहन राऊत - धामणगाव रेल्वे : शाळा, आरोग्य केंद्र, उपकेंद्र, पशुचिकित्सालय, अंगणवाडी इमारतीच्या रंगरंगोटीचे दोन हजार, तर एका विभागाचे तीन वर्षांचे फाईल तयार करण्याचे तीन हजार असे दर ठरले. पंचायतराज समितीच्या तपासणी दौऱ्याने अनेक बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळाली आहे.
जिल्ह्यात आगामी ६ ते ८ ऑक्टोबर या तीन दिवस पंचायत राज समितीचा तपासणी दौरा होणार आहे. जिल्हा परिषद अंतर्गत येणारे बांधकाम, शिक्षण, आरोग्य, सांख्यिकी, पंचायत विस्तार, पशुसंवर्धन, रोहयो या सर्वच विभागातील अधिकारी, कर्मचारी युद्धस्तरावर कामाला लागले आहेत. यादरम्यान शनिवार-रविवार या दोन सुट्यांच्या दिवशीही तब्बल रात्री दहा वाजेपर्यंत पंचायत समितीचे कामकाज सुरू होते. पंचायत राज समितीतील सदस्य नेमके कोणत्या वेळी, कुठल्या तालुक्यात, कोणत्या गावातील कोणत्या विभागाची तपासणी करणार, याची कल्पनाही नसते. त्यामुळे प्रत्येक विभाग आपल्या पद्धतीने कामाला लागले आहे.
---------
दिवाळीसारखी होतेय साफसफाई आणि स्वच्छता
तालुक्यातील अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, पशु दवाखाने, शाळा यांच्या रंगरंगोटीचे काम सुरू झाले आहे. एक इमारतीच्या रंगरंगोटीचे दोन ते तीन हजार रुपयांचे दर ठरले आहे. विशेष म्हणजे, परिसर अस्वच्छ राहू नये, यासाठी स्वच्छता अभियान राबविले जात आहे. दिवाळीसारखी प्रत्येक कार्यालयाची साफसफाई व स्वच्छता होत असताना पाहायला मिळत आहे. कोणत्या योजनेची माहिती या समितीतील सदस्य मागणार, याचा नेम नाही. आपल्या फाईलमध्ये त्रुटी राहिल्या थेट मुंबईवारी करावी लागेल, या भीतीपोटी प्रत्येक अधिकारी-कर्मचारी डोळ्यात तेल टाकून काम करीत आहेत. प्रत्येक कागद क्रमानुसार असावा, याकरिता अधिकारी-कर्मचारी स्वतः जुने कागदाला नवी फाईल लावून त्यावर कव्हर लावत आहेत. याकरिता तीन वर्षांच्या एका विभागाचे फाईल तयार करण्यासाठी सुशिक्षित बेरोजगारांना तीन ते साडेतीन हजार रुपये दिले जात आहे.
-------------