उड्डाण पुलावरून पडल्याने दोन विद्यार्थी गंभीर
By Admin | Updated: September 23, 2015 00:11 IST2015-09-23T00:11:42+5:302015-09-23T00:11:42+5:30
भरधाव दुचाकी उड्डाण पुलाला धडकून दोन विद्यार्थी पुलाखाली कोसळल्याची घटना सोमवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास मालवीय चौकानजीक घडली.

उड्डाण पुलावरून पडल्याने दोन विद्यार्थी गंभीर
मालवीय चौकजवळील घटना : दोघेही कारजा लाड येथील रहिवासी
अमरावती : भरधाव दुचाकी उड्डाण पुलाला धडकून दोन विद्यार्थी पुलाखाली कोसळल्याची घटना सोमवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास मालवीय चौकानजीक घडली. अंकुश विलास गवई (२५) व प्रथमेश पुंडलिक इंगळे (२७, दोघेही राहणार कारंजा लाड) अशी जखमींची नावे आहेत.
वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील रहिवासी अंकुश गवई व प्रथमेश इंगळे हे दोघेही गाडगेनगर परिसरात भाड्याने खोली घेऊन राहतात. ते बडनेरा मार्गावरील राम मेघे महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. सोमवारी रात्री दोघेही दुचाकी एम.एच.- ३७-एन.-६६९८ ने बडनेरा मार्गावरील एका हॉटेलमध्ये जेवणाकरिता गेले होते. तेथून परत जाताना दोघेही राजापेठ ते इर्विन चौकाकडे जाणाऱ्या उड्डाणपूलावरून गाडगेनगरकडे जात असताना मालवीय चौकानजीक उड्डाण पुलाच्या कठड्यावर त्यांची दुचाकी आदळली व दोघेही खाली कोसळले. घटनेची माहिती काही नागरिकांनी शहर कोतवाली पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून दोघांना जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने दोघांनाही खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. (प्रतिनिधी)
उड्डाणपूलाने घेतले १० बळी
निर्मितीपासून आतापर्यंत उड्डाण पुलाखाली पडून १० जणांचे बळी गेले आहेत. शाम चौकातील उड्डाण पुलाच्या वळणमार्गावर हे अपघात घडले होते. महापालिकेने येथे अतिरिक्त संरक्षण कठडे लावल्यानंतर अपघात झाला नाही. मात्र, सोमवारी मालवीय चौकजवळील उड्डाण पुलाच्या कठड्याला धडकून दोन विद्यार्थी गंभीर जखमी झालेत.