दोन रूपयांची बैलजोडी, सहा रूपयांचा कर
By Admin | Updated: November 3, 2016 00:20 IST2016-11-03T00:20:12+5:302016-11-03T00:20:12+5:30
गावाचा सर्वांगीण विकास व्हावा व गावात स्वच्छता राहावी, यासाठी नगराध्यक्षपदी विराजमान होताच पहिले ...

दोन रूपयांची बैलजोडी, सहा रूपयांचा कर
आठवण निवडणुकीची : प्रथम नगराध्यक्ष सुगनचंद लुणावत
मोहन राऊत धामणागाव रेल्वे
गावाचा सर्वांगीण विकास व्हावा व गावात स्वच्छता राहावी, यासाठी नगराध्यक्षपदी विराजमान होताच पहिले नगराध्यक्ष झालेले सुगनचंद चुन्नीलाल लुणावत यांनी दोन रूपयांची बैलजोडी घेऊन गावाच्या विकासासाठी कोणताही शासनाकडून निधी मिळत नसल्याने इतर गावातून येणाऱ्या बैलगाड्यांवर महिन्याकाठी सहा रूपयांचा कर लावण्याचा निर्णय घेतला होता़
धामणगाव पालिकेची पहिली निवडणूक ३० नोव्हेंबर १९४६ रोजी झाली. यावेळी धामणगाव ही मध्यप्रदेशची राजधानी होती़ यावेळी झालेल्या निवडणुकीत सुगनचंदजी चुन्नीलाल लुणावत हे नगराध्यक्ष तर दोन उपाध्यक्ष म्हणून लक्ष्मीनारायण दुलिचंद व देवराव नारायण इंगळे हे होते़
धामणगावातील मैला बाहेर नेण्यासाठी बैलजोडी नसल्याने नगराध्यक्षपदी विराजमान होताच सर्व सदस्यांच्या सहमतीने दोन रूपयांची बैलजोडी विकत घेतली व गावाच्या स्वच्छता मोहिमेकडे लक्ष वेधले होते़ धामणगाव ही पूर्वीच्या काळापासून व्यापारी पेठ असल्याने इतर गावातील बैलबंड्या कापूस व धान्य विक्रीकरिता धामणगाव शहरात येत असत. या काळात शासनाकडून कोणताच निधी मिळत नसल्याने महिन्याकाठी सहा रूपये करवसुली करण्यात येत होती.
रीतसर पावती देऊन दरवेळी येणाऱ्या शेतकऱ्यांना एकदा फाडलेली पावती महिन्याच्या शेवटपर्यंत शहरात येताना दाखवावी लागत असे़ करवसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महिन्याकाठी चौदा रूपये वेतन व अकरा रूपये महागाईभत्ता दिला जात होता़ महात्मा गांधींच्या हत्येची बातमी धामणगावात येताच संपूर्ण गावात स्मशानशांतता पसरली होती़ तर तिसऱ्या दिवशी पालिकेच्या परिसरात संपूर्ण गावाने एकत्र येऊन श्रद्धांजली वाहिली होती़
१ डिसेंबर १९४८ रोजी महाविदर्भ निर्मितीचा ठराव घेण्यात आला होता़ मध्यप्रदेश व वऱ्हाडचे कायदेमंत्री अण्णासाहेब देशमुख तसेच शिक्षणमंत्री गोखले यांना सन्मानपत्र देण्याकरिता ५० रूपयांचा खर्च सर्वानुमते ठरावात मंजूर करण्यात आला होता़
१९ एप्रिल १९४७ मध्ये मुन्सिपल कमिटीच्या ताब्यात असणाऱ्या शाळेतील शिक्षकांना महिन्याकाठी अकरा रूपये वेतन दिले जायचे़ सुगनचंद लुणावत यांनी ३० नोंव्हेबर १९४६ ते २५ मार्च १९५० पर्यंत यशस्वीपणे कार्यभार सांभाळला होता़
यावेळी सदस्य म्हणून मारोती किसनसा खंडेतोड, लक्ष्मण गोंविद झामरे, पदमसीभाई बेरसीभाई, शिवाजी मोतीराम, रणछोडदास खिमजी, सूरजमल मोतीलाल सोनी, जगदत्त महेश चौबे, रामहक्क जगदेव, रामणराव जानबाजी, नारायणराव किसनराव, लाभचंद गुलाबचंद राठी, तुळसीदास पंत जनार्धन देशपांडे, अबदुल शकरू उमर, कौशल्याबाई केणे हे प्रामुख्याने सदस्य म्हणून कार्यरत होते़