तीन लाखांची खंडणी मागणाऱ्या दोन तोतया पत्रकारांना अटक
By Admin | Updated: March 2, 2017 00:05 IST2017-03-02T00:05:19+5:302017-03-02T00:05:19+5:30
लाचेचे पैसे घेतल्याचे व्हिडिओ फुटेज मिडियावर दाखवून बदनामी करण्याची धमकी कृषी विभागाच्या प्रकल्प उपसंचालकाला देऊन तीन लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार बुधवारी उघड झाला.

तीन लाखांची खंडणी मागणाऱ्या दोन तोतया पत्रकारांना अटक
बनावट ओळखपत्र : कृषी प्रकल्प उपसंचालकांची तक्रार
अमरावती : लाचेचे पैसे घेतल्याचे व्हिडिओ फुटेज मिडियावर दाखवून बदनामी करण्याची धमकी कृषी विभागाच्या प्रकल्प उपसंचालकाला देऊन तीन लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार बुधवारी उघड झाला. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी दोन तोतया पत्रकारांना अटक केली. महेंद्र विजय बल्लेवार (३४,रा. बापटनगर, चंद्रपूर) व स्वप्निल रमेश पोखरे (२७,रा.कृष्णानगर, चंद्रपुर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस सूत्रानुसार अंबादास काळोबा मिसाळ (४९,रा. अर्जुननगर) हे विसावा कॉलनी स्थित कृषी विभागाच्या ‘आत्मा’ अमरावती येथे प्रकल्प उपसंचालकपदावर कार्यरत आहेत. २१ फेब्रुवारी रोजी मिसाळ यांच्याकडे इलेक्ट्रॉनिक्स मिडियाचे दोन प्रतिनिधी आले. त्यांच्याजवळ प्रणय राऊत व राहुल मेश्राम नावाचे ओळखपत्र होते. मिसाळ हे सन २०१३-१४ मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे तालुका कृषी अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यावेळी त्यांचे लाच घेतानाचे व्हिडिओ फुटेज काढल्याचे आरोपींनी मिसाळ यांना सांगितले. ती व्हिडिओ क्लिप आमच्या वृत्त वाहिनीवर दाखविल्यास तुमची बदनामी होईल. जर ते फुटेज व्हायरल करायचे नसेल, तर तुम्हाला तीन लाख रूपये द्यावे लागतील. ही क्लिप व्हायरल झाल्यास वृत्त वाहिन्यावर तुम्ही निलंबित होऊ शकता, अशी धमकी देऊन आरोपींनी मिसाळ यांना खंडणी मागितली. मिसाळ यांनी भीतीपोटी आरोपींना १ लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले. मात्र, आरोपी तीन लाखांची रोखच हवी, या भूमिकेवर ठाम होते.
बनावट ओळखपत्रांसह ‘व्हिडिओ कॅमेरा’ जप्त
अमरावती : अखेरीस मिसाळ यांनी पोलीस विभागातील त्यांच्या नातेवाईकाला याप्रकाराबाबत माहिती दिली. नातलगाच्या सल्ल्यानुसार मिसाळ यांनी २५ फेबु्रवारी रोजी गाडगेनगर पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरूद्ध तक्रार नोंदविली. बुधवारी आरोपींनी मिसाळ यांना फोन करून पुन्हा पैशांची मागणी केली. मिसाळ यांनी आरोपींना कार्यालयात येण्याचे सांगितले. दरम्यान ही माहिती गाडगेनगर पोलिसांनाही दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक के.एम.पुंडकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अनिल मुळे, पोलीस कर्मचारी विक्रम नशिबकर व रंजीत गावंडे यांनी मिसाळ यांच्या कार्यालयात सापळा रचून दोन्ही आरोपींना रंगेहात अटक केली. पोलिसांनी दोघांचीही चौकशी करुन झडती घेतली असता त्यांच्याजवळून बनावट ओळखपत्र आढळून आले. त्यावेळी महेंद्र बल्लेवार व स्वप्निल पोखरे अशी या तोतया पत्रकारांची नावे असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३८५, ४१९, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल करुन त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे.
व्हिडिओ कॅमेऱ्यासह अन्य साहित्य जप्त
दोन्ही तोतया पत्रकारांची पोलिसांनी झडती घेतली असता त्यांच्याजवळ बनावट ओळखपत्र आढळून आले. पोलिसांनी ओळखपत्रांसह त्यांच्याजवळून पॅनकार्ड, विविध नागरिकांची पासपोर्ट छायाचित्रे, व्हिडिओ कॅमेरा व अन्य साहित्य जप्त केले आहे.
मंडळ अधिकाऱ्यालाही मागितली होती खंडणी
अंबादास मिसाळ हे अहेरीत कार्यरत असताना तेथील एका मंडळ अधिकाऱ्याची लाच घेतानाची क्लिप आरोपींनी काढली होती. छुप्या कॅमेऱ्याद्वारे ती क्लिप काढल्यानंतर आरोपींनी मंडळ अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करून खंडणी मागितली होती.
बनावट ओळखपत्राद्वारे मीडिया प्रतिनिधी असल्याचे सांगून आरोपींनी अधिकाऱ्याला खंडणी मागितली. सापळा रचून दोन्ही आरोपींना पकडण्यात आले आहे.
-के.ए.पुंडकर,
पोलीस निरीक्षक,
गाडगेनगर ठाणे