अमरावती: मेडिकल व्यवसायिकाला जबरीने लुटणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी गजाआड केले. तर तिसऱ्या आरोपीचा शोध सुरु आहे. रोशन विनायक रोहणकर (रा. नवाथे नगर) व रुपेश ऊर्फ बंटी राजू चव्हाण (रा. महाजन पुरा) असे अटक आरोपींची नावे आहेत. टोपे नगरातील रहिवासी संजय खंडेलवाल हे २७ जुलै रोजी मेडिकल बंद करून घरी जात होते. दरम्यान टोपे नगरजवळच दोन अज्ञात युवकांनी त्यांच्या दुचाकीला धडक देऊन मारहाण केली आणि त्यांच्याजवळील बॅग ४० हजार रुपये व मोबाईल जबरीने हिसकावून पळ काढला. याघटनेची शहर कोतवाली ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली असून पोलिसांनी तीन अज्ञाताविरुध्द गुन्हा नोंदविला. या जबरी चोरीचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी गुन्हे शाखेला चौकशीचे आदेश दिले. आरोपीचा कोणाताही सुगावा नसल्यामुळे पोलिसांनी बातमीदाराचा उपयोग करून माहिती काढण्यास सुरुवात केली. बातमीदाराने दिलेल्या गुप्त माहितीवरून पोलीस उपायुक्त शशिकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक अनिल किनगे, पोलीस उपनिरिक्षक प्रवीण वेरुळकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक दिलीप वाघमारे, हेड कॉन्स्टेंबल दीपक श्रीवास, चैतन्य रोकडे, प्रणय वाघमारे, विनय मोहोड, निलेश गुल्हाने, सैय्यद इम्रान व चालक राजेश गायकवाड यांनी बुधवारी दोन्ही आरोपींना अटक केली. त्यांची चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपीजवळून दोन दुचाकी जप्त केल्या असून त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघड होण्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. दोन्ही आरोपींना मंगळसूत्र चोरी प्रकरणात अटक करण्यात आली होती. पोलिसांनी त्यांची चौकशी केल्यानंतर काही गुन्हे उघड झाले होते. त्यानंतर न्यायालयातून ते जामीनावर सुटले होते. मात्र, गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे आरोपींनी पुन्हा जबरी चोरी सुरु केल्याचे आढळून आले. आरोपींनी संजय खंडेलवाल यांना सुध्दा लुटले. खंडेलवाल यांचा मुलगा आरोपींचा मित्रआरोपी बंटी चव्हाण हा शहरातील नामांकीत अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी असून तो तक्रारकर्ता संजय खंडेलवाल यांच्या मुलाचा मित्रच आहे. खंडेलवाल यांना लुटताना बंटी व रोशन हे दोंघेही दुचाकी क्रमांक एमएच २७ एझेड-२२० ने टोपे नगरात आले होते, तर तिसरा पसार आरोपी हा दुचाकी क्रमांक एमएच २७ बीसी-५५९४ ने वॉच ठेवत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. बंटी हा आरोपीचा मित्र असल्यामुळे पोलीस खंडेलवाल यांच्या मुलाला चौकशीकरिता बोलाविणार आहे.
मेडिकल व्यवसायिकाला लुटणारे दोघे गजाआड
By admin | Updated: August 4, 2016 00:04 IST