मतदारसंघात दोन रेल्वे उड्डाणपुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:11 IST2020-12-26T04:11:02+5:302020-12-26T04:11:02+5:30
फोटो पी २५ जगताप चांदूर रेल्वे : धामणगाव रेल्वे व चांदूर रेल्वे शहरातील उड्डाणपूल मंजुरीनंतर आता पुन्हा नव्या ...

मतदारसंघात दोन रेल्वे उड्डाणपुल
फोटो पी २५ जगताप
चांदूर रेल्वे : धामणगाव रेल्वे व चांदूर रेल्वे शहरातील उड्डाणपूल मंजुरीनंतर आता पुन्हा नव्या दोन रेल्वे उड्डाण पुलाला मंजुरी मिळाली आहे. त्यासोबत बहुचर्चित चांदूर रेल्वे ते कु-हा रस्त्याच्या बांधकामालाही मान्यता मिळाल्याची माहिती माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी पत्रपरिषदेत दिली.
या बजेटमध्ये मतदारसंघातील अंदाजे ६०० कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. त्यात चांदूर रेल्वे येथून जाणाऱ्या अमरावती वर्धा बायपासवरील रेल्वे उड्डाणपूल, मंगरुळ दस्तगीर ते पुलगाव रस्त्यावरील चिंचोली ते ओकनाथ गावातील रेल्वे मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाचा समावेश आहे. यासोबत नागपूरला जोडणारा तिवसा मार्गावरील चांदूर रेल्वे- कु-हा रोडचेही बांधकाम होणार असून, नांदगाव खंडेश्वर ते राजुरा रस्ता, चांदूर-सोनेगाव, बग्गी- राजुरा या १९ किमी लांबीच्या रस्त्यासाठी ५ कोटी रुपये मंजूर झाल्याचे जगताप यांनी सांगितले.
सोबतच नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धानोरा गुरव ते पापड, वाढोणा या २१ किमी लांबीच्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठीही २ कोटी, तर नांदगाव ते सावनेर, मोखड, मांजरी-म्हसला रस्त्यावरील पुलाच्या कामासाठी ७५ लाखांचा निधी मंजूर झाल्याचे सांगण्यात आले. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जनुना, लोणी, मोरगाव जनुना रस्त्यावर २ कोटी २५ लक्ष रुपयांच्या पुलाचे काम मंजूर झाले आहे. तसेच आशियाई विकास बँकेमार्फत अर्थसहाय्यीत असलेल्या अंजनवती - अंजनसिंगी जुना धामणगाव, देवगाव या रस्त्याच्या २३३ कोटी रुपयांच्या कामाला सुरुवात झाली असून, या रस्त्याचे काम दीड वर्षात पूर्ण होणार असल्याचे ही या पत्रकार परिषदेत जगताप यांनी सांगितले. तसेच चांदुर रेल्वे, धामणगाव रेल्वे व नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वेगवेगळ्या रस्त्यांची राज्य महामार्ग व प्रमुख जिल्हा महामार्ग यांची दुरुस्ती व सुधारणा करणे यासाठी ४ फेब्रुवारी २०२० रोजी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेतली होती. त्यानुसार विधानभवनात बैठक घेऊन मतदार संघातील कामे मंजूर करून घेतल्याचे या पत्रकार परिषदेत सांगितले. हे सर्व कामे मंजूर केल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचे जनतेच्यावतीने माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी आभार मानले. पत्रपरिषदेला माजी सभापती गणेश आरेकर आदी उपस्थित होते.