दुचाकीचे दोन तुकडे, ऑटोरिक्षाचा चुराडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:09 IST2021-06-11T04:09:40+5:302021-06-11T04:09:40+5:30
अचलपूर-परतवाडा मार्गावर अपघात : युवक जखमी परतवाडा : शहरातील परतवाडा-अचलपूर मार्गावर अचलपूर कृषिउत्पन्न बाजार समितीनजीक दुचाकी व ...

दुचाकीचे दोन तुकडे, ऑटोरिक्षाचा चुराडा
अचलपूर-परतवाडा मार्गावर अपघात : युवक जखमी
परतवाडा : शहरातील परतवाडा-अचलपूर मार्गावर अचलपूर कृषिउत्पन्न बाजार समितीनजीक दुचाकी व ऑटोरिक्षाच्या अपघातात दुचाकीचे दोन तुकडे झाले, तर ऑटोरिक्षाचा चुराडा झाला. गुरुवारी सकाळी १० वाजता झालेल्या या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.
फुलचंद आठवले (२८, रा. धोत्रा ढाणा, बैतूल, मध्यप्रदेश) हा अचलपूर शहरातील देवळी येथील रस्त्याच्या कामावर दुचाकीने जात होता. विरुद्ध दिशेने येणाऱ्या ऑटोरिक्षा (एमएच २७ बीडब्लू २४२९) मध्ये गहू विकण्याकरिता नेण्यात येत होता. बाजार समितीसमोर दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली. धडक एवढी गंभीर होती की, अपघातात ऑटोरिक्षाचा पुढील भाग चक्काचूर झाला, तर दुचाकीचा पुढील भाग तुटून पडला. अपघातामुळे मोठा आवाज झाला. त्यामुळे नागरिकांनी ताबडतोब धाव घेत अपघातग्रस्तांना बाजूच्या रुग्णालयात दाखल केले व तेथून उपजिल्हा रुग्णालयात पुढील उपचारार्थ दाखल केले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले पोलिसांची कारवाई सुरू होती
बॉक्स
बेदरकार वाहतुकीचा फटका
अचलपूर ते परतवाडा ही जुळी शहरे असून, त्यांना जोडणाऱ्या मार्गावर दुचाकी व ऑटोरिक्षा बेदरकार चालविले जात असल्याचा प्रकार नित्याचा आहे. दुसरीकडे याच मार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे. गुरुवारी आठवडी बाजार असल्याने मार्गावर वाहनांची वर्दळ होती. मार्गावर शहरातील सर्वाधिक खासगी दवाखाने असल्यामुळे त्यांच्यापुढे वाटेल तेथे वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. अशात मोठा अपघात होण्याची भीती वर्तविली जात असून, पोलीस प्रशासनाने त्याची दखल घेण्याची मागणी होत आहे.