कोविड सेंटरला दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:13 IST2021-05-26T04:13:25+5:302021-05-26T04:13:25+5:30
पालकमंत्र्याकडून भेट; उपचार यंत्रणेला पुरेशी साधनसामग्रीही देणार अमरावती : कोविड प्रतिबंधासाठी उपचार यंत्रणेचा विस्तार करतानाच जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहात कोविड ...

कोविड सेंटरला दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध
पालकमंत्र्याकडून भेट; उपचार यंत्रणेला पुरेशी साधनसामग्रीही देणार
अमरावती : कोविड प्रतिबंधासाठी उपचार यंत्रणेचा विस्तार करतानाच जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहात कोविड केअर तथा समुपदेशन केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्राला पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट दिले. हे केंद्र सुसज्ज होण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा मिळवून देऊ, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
शिवटेकडी परिसरातील जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहात उभारण्यात आलेल्या कोविड केअर तथा समुपदेशन केंद्र नुकतेच सुरू करण्यात आले. या केंद्रासाठी पालकमंत्र्यांनी स्वत:कडून दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट दिले. आमदार बळवंत वानखडे यांच्यासह जिल्हा परिषदेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. ग्रामीण भागात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर उपचार यंत्रणेचाही विस्तार करण्यात येत आहे. साथ नियंत्रणासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख, उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, सभापती बाळासाहेब हिंगणीकर, दयाराम काळे, पूजा आमले, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांची संकल्पना व सहकार्यातून हे कोविड केअर सेंटर सुरू झाले. या केंद्राला आवश्यक ती सर्व साधने मिळवून देण्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. या कोविड केअर सेंटरला सद्यस्थितीत २० खाटांची सुविधा करण्यात आली आहे. यापुढे आणखी दहा बेडचे नियोजन याठिकाणी करण्यात येणार आहे. या केंद्राचा अतितातडीच्या वेळी कोरोनाच्या रुग्णांना उपयोग होईल. या केंद्रात रुग्णांच्या वैद्यकीय उपचार व देखभालीसाठी एक वैद्यकीय अधिकारी, तीन समुदाय आरोग्य अधिकारी, दोन परिचारिका कार्यरत राहणार आहेत.