आणखी दोन दिवस राहणार थंडीचा जोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2017 00:12 IST2017-03-16T00:12:06+5:302017-03-16T00:12:06+5:30
यंदा उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. मार्च महिन्याच्या प्रारंभीच उन्हाचे चटके सहन करणाऱ्या अमरावतीकरांना या आठवड्यात मात्र सुखद धक्का मिळाला आहे.

आणखी दोन दिवस राहणार थंडीचा जोर
वातावरणात बदल : विदर्भात तुरळक पावसाची शक्यता
अमरावती : यंदा उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. मार्च महिन्याच्या प्रारंभीच उन्हाचे चटके सहन करणाऱ्या अमरावतीकरांना या आठवड्यात मात्र सुखद धक्का मिळाला आहे. दिवसाचे उन कमी झाल्यावर रात्री थंडीमुळे स्वेटर घालण्याची वेळ आली आहे. वातावरण बदलामुळे शहराचा पारा १६ अंशापर्यंत खाली आला आहे. या बदलाने आबालवृद्धांना सर्दी, तापासारखे आजार वाढले आहेत, मात्र पिकांवर या वातावरणाचा तुर्तास परिणाम नसल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा जोर फेब्रुवारी मध्यापासून कमी होत असतो. मात्र यंदा जम्मू-काश्मीर व हिमाचल प्रदेशात सुरू असलेली बर्फवृष्टी व उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्याचे प्रमाण मार्च महिन्यात देखिल कायम असल्याने वातावरणात थंडी वाढली आहे.
मागील आठवड्यात पूर्व विदर्भासह मध्यप्रदेशातील काही भागात झालेली गारपीट व काही भागामध्ये झालेला पाऊस यामुळे देखिल तापमानात कमी आलेली आहे. राजस्थान आणि तेलंगणादरम्यान ‘सायक्लोनिक सर्क्युलेशन’ तयार झाले आहे. त्यामुळे वाऱ्याचा वेग वाढला आहे. परिणामी तापमान कमी येत असल्याचे हवामान खात्याने सांगितले. वास्तविकता मार्च महिन्यात तापमान ३५ ते ४० अंशावर असते. या आठवड्यात तापमानात चढउतार होत असल्याने नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळाला आहे. मात्र विषम वातावरण व अचानक झालेला वातावरणाचा बदल आरोग्यावर परिणाम करीत आहे. (प्रतिनिधी)
वातावरणात बदल, आरोग्य सांभाळा
आला उन्हाळा, आरोग्य सांभाळा असे म्हटल्या जात असे. आता वाढली थंडी, आरोग्य सांभाळा म्हणण्याची वेळ आली आहे. दिवसा ऊन, रात्री थंडीमुळे सर्वांनाच सर्दी-खोकला आणि ताप आदी आजार होत आहे. या विषम हवामानात लहान मुले व वृद्धांची विशेष काळजी घेतली पाहीजे. सद्या परिक्षेचा काळ असल्याने विद्यार्थ्यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी. काही दिवस थंड पदार्थ न खाण्याचा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.
दोन दिवस राहणार थंडीचा जोर
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा जोर आणखी दोन दिवस राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मात्र काश्मीरमध्ये अशीच बर्फवृष्टी होत राहिल्यास जिल्ह्याच्या तापमानात आणखी कमी येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. साधारणपणे १४ अंशापर्यंत रात्रीचे तापमान राहण्याची शक्यता आहे.
दशकात प्रथमच मार्चमध्ये थंडी
यापूर्वी २०१५ मध्ये झालेल्या गारपीटनंतर एक, दोन दिवस वातावरणात गारवा होता. या दशकात प्रथमच यंदा पारा १६ अंशावर आला. यापूर्वी २००७ मध्ये पारा १४ अंशावर आला होता. दरवर्षी मार्च महिन्यात ३६ ते ४० अंशाऐवढे तापमान राहते.
विदर्भात तुरळक पावसाची शक्यता
विदर्भातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती पीकेव्हीच्या केंद्रीय अधिकाऱ्यांनी दिली. जनावरांची योग्य काळजी घ्यावी, पक्वफळांची काढणी करून संरक्षित ठिकाणी साठवणूक करावी अशा सूचना आहेत.
गहू-हरभऱ्यावर परिणाम नाही
तापमान कमी होत असल्याने गहु व हरभऱ्यावर या वातावरण बदलाचा परिणाम झाला असता. मात्र ही दोन्ही पिके आता काढणीवर आल्याने फारसा परिणाम होणार नाही. वातावरण बदलाचा कालावधी वाढल्यास विपरित परिणाम होऊ शकतो.