धनादेश अनादरण प्रकरणी दोन महिने कारावास
By Admin | Updated: July 30, 2015 00:21 IST2015-07-30T00:21:19+5:302015-07-30T00:21:19+5:30
तिवसा येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांनी धनादेश अनादर प्रकरणात दिनेश मारोतराव काळे यांना दोन महिने कारावास व ७४ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

धनादेश अनादरण प्रकरणी दोन महिने कारावास
न्यायालयाचे आदेश : श्री नवदुर्गा पतसंस्थेकडून घेतले होते कर्ज
धामणगाव रेल्वे : तिवसा येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांनी धनादेश अनादर प्रकरणात दिनेश मारोतराव काळे यांना दोन महिने कारावास व ७४ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम दोन महिन्यांच्या आत न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा भोगावी लागेल, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
श्री नवदुर्गा नागरी सहकारी पत संस्था मर्यादित धामणगांव रेल्वेच्या नेरपिंगळाई शाखेने दिनेश मारोतराव काळे यांना हॉटेलच्या व्यवसायाकरिता दीड लाख रुपयांचे कर्ज दिले होते. परंतु दिनेश मारोतराव काळे यांनी कराराप्रमाणे कर्जाच्या रकमेची परतफेड केली नाही. पतसंस्थेनी थकीत कर्जाची अनेकवेळा मागणी केली असता या थकीत कर्जाच्या भरण्यापोटी दिनेश काळे यांनी पत संस्थेला ६४ हजार रूपयांचा धनादेश दिला. परंतु तो धनादेश न वटता परत आला. त्यामुळे पतसंस्थेने न्यायालयात दाद मागितली. दोन्ही पक्षांचे पुरावे व कागदपत्रे तपासल्यानंतर न्यायालयाने आरोपी दिनेश मारोतराव काळे यांना दोन महिन्यांचा कारावास व ७४ हजार रूपयांचा दंड ठोठावला. दंडाची रक्कम दोन महिन्यांच्या आत भरण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दंडाची रक्कम न दिल्यास एक महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा भोगावी लागेलस असा आदेश पारित केला आहे. हा आदेश पारित झाल्यानंतर संस्थेचे संस्थापक अरूण अडसड यांनी सर्व कर्जदारांना थकीत कर्ज न ठेवण्याबाबत व कर्जाच्या रकमेचा नियमित भरणा करण्याचे आवाहन केले. श्री नवदुर्गा पतसंस्थेच्यावतीने आर.जे. चांडक व राजेश आर.चांडक यांनी न्यायालयाचे काम पाहिले. (तालुका प्रतिनिधी)