ठिबक सिंचनाचे दोन कोटी थकीत

By admin | Published: April 28, 2017 12:06 AM2017-04-28T00:06:44+5:302017-04-28T00:06:44+5:30

तालुक्यातील तालुका कृषी विभागाने शासकीय अनुदानासाठी दोन वर्षांपासून ठिबक सिंचन योजनेच्या अनुदानासाठी शासनाकडे

Two million tired of drip irrigation | ठिबक सिंचनाचे दोन कोटी थकीत

ठिबक सिंचनाचे दोन कोटी थकीत

Next

चांदूररेल्वेतील शेतकऱ्यांची व्यथा : शासकीय तिजोरीत ठणठणाट
चांदूररेल्वे : तालुक्यातील तालुका कृषी विभागाने शासकीय अनुदानासाठी दोन वर्षांपासून ठिबक सिंचन योजनेच्या अनुदानासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. परंतु शेतकऱ्यांना अद्यापही अनुदान न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये शासनाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
राज्यातील कृषिमंत्री विदर्भातील असताना विदर्भातील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अनुदान कधी मिळणार, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत. सन २०१४-१५ या कालावधीत ५२९ शेतकऱ्यांचे १ कोटी ३५ लाख ४७ हजार रूपयांचे प्रस्ताव दाखल झाले. त्यातील ३९ लाख ३५ हजारांचे अनुदान प्राप्त झाले असले तरी तब्बल ९६ लाख रूपयांचे अनुदान मात्र तब्बल दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. सन २०१-१६च्या कालावधीत ६६४ शेतकऱ्यांचे १ कोटी ७४ लाख रूपयांच्या अनुदानासाठी शासनाकडे प्रस्ताव दाखल करण्यात आले होते. त्यापैकी १५ लाख २० हजार रूपयांचे अनुदान मंजूर झाले. मात्र, १ कोटी ५७ लाख रूपयांच्या ठिबक सिंचन योजनेच्या प्रस्तावाला शासनाकडून मंजुरी मिळालेली नाही. सन २०१४-१५ व सन २०१५-१६ या दोन वर्षांपासून २ कोटी ५३ लाख रूपये अनुदानाचे प्रस्ताव शासनाकडे धूळखात पडून आहेत.
शेतकऱ्यांना ठिबक सिंचन अनुदान देण्यासाठी शासनाच्या तिजोरीत ठणठणाट असल्याचे दिसते. शासनाच्या जलशिवार योजनेतून पाणी अडवून प्रत्येक शेतकऱ्याने ठिबक सिंचन योजना कार्यान्वित केल्यानंतर त्याचे अनुदान तत्काळ देण्यात येईल, अशा घोषणा विधिमंडळात व विधिमंडळाबाहेर होत असतात. मात्र, प्रत्यक्षात ठिबक सिंचन योजनेबद्दल प्रचंड उदासीनता असल्याचे दिसते. या योजनेच्या अनुदानासाठी कृषी विभागाकडून मंजुरी घेऊन प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यामुळे कृषी विभागातील गावनिहाय नियुक्त कर्मचाऱ्यांनीही याची दखल घेतली नाही.
कृषी विभागात गावनिहाय कृषी सहायक नेमण्यात आले आहेत. त्यांच्याकडून शेतकऱ्यांच्या शेतात बसविलेल्या ठिबक सिंचन संचाची तपासणी करून तसा अंतरिम अहवाल कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मागविला जावा, अशीही मागणी शेतकरी करीत आहेत. ठिबक सिंचनामुळे ओलिताच्या क्षेत्रात वाढ होऊन पाण्याच्या अपव्ययाला पायबंद बसला आहे. शासनाकडे ठिबक सिंचन अनुदानासाठी एकूण किती प्रस्ताव प्राप्त झाले आहेत? कोणत्या कारणाने शेतकऱ्याला अनुदान नाकारले, याची माहिती शासनाच्या कृषी विभागाकडून प्रसिद्ध होणे अगत्याचे आहे.
शासनाने याची दखल न घेतल्यास शेतकऱ्यांना कृषी कार्यालयात जाऊन तीव्र संघर्ष करावा लागेल, असा इशारा देण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)

शासनाची उदासिनता शेतकऱ्यांच्या मुळावर
ठिबक सिंचनाचा वापर केल्याने शेतकऱ्यांचा बराच फायदा होतो. यामुळे ओलिताचे क्षेत्र वाढत असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनातही वृद्धी होते. मात्र, ठिबक सिंचनाचे अनुदान देण्याबाबतची शासनाची उदासिनता लक्षात घेता शेतकऱ्यांना या योजनेचा फारसा फायदा होेण्याची चिन्हे नाहीत.

 

Web Title: Two million tired of drip irrigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.