सोयाबीनचे दोन लाख क्विंटल बियाण्यांचा यंदाही तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:13 IST2021-03-15T04:13:10+5:302021-03-15T04:13:10+5:30
गजानन मोहोड अमरावती : दरवर्षी वाढणारे सोयाबीन पिकाचे क्षेत्र कृषी विभागासाठी डोकेदुखी ठरत आहे. गत हंगामात परतीच्या पावसाने सोयाबीन ...

सोयाबीनचे दोन लाख क्विंटल बियाण्यांचा यंदाही तुटवडा
गजानन मोहोड
अमरावती : दरवर्षी वाढणारे सोयाबीन पिकाचे क्षेत्र कृषी विभागासाठी डोकेदुखी ठरत आहे. गत हंगामात परतीच्या पावसाने सोयाबीन उद्ध्वस्त झाल्याने यंदाही बियाण्यांसाठी मारामार राहणार आहे. कंपनीद्वारा वांझोटे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारून यंदाचाही हंगाम वाया जाऊ नये, यासाठी कृषी विभागाला आतापासूनच अलर्ट राहावे लागणार आहे.
रबी हंगाम संपण्यांपूर्वीच कृषी विभागाने यंदाच्या खरीप हंगामासाठी तयारी सुरू केलेली आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस खरिपाचे नियोजन आयुक्तालयास सादर करण्यात आले. यात यंदा खरिपाची क्षेत्रवाढीची शक्यता वर्तविलेली आहे. त्यातही किमान ५३ हजार हेक्टरमध्ये सोयाबीनची क्षेत्रवाढ गृहीत धरण्यात आलेली आहे. त्यानुसार यंदाच्या हंगामात ७ लाख २८ हजार ११२ हेक्टरमध्ये खरिपाचे क्षेत्र राहील, असा अंदाज आहे. यात किमान २ लाख ७० हजार हेक्टर सोयाबीनचे व २ लाख ५१ हजार ५४२ हेक्टर संकरीत कपाशी व उर्वरित क्षेत्रात अन्य पिके राहणार असल्याचा अहवाल आहे. यात सोयाबीन वगळता उर्वरित ४ लाख ५८ हजार ११२ हेक्टरमध्ये यंदा अन्य पिकाचे क्षेत्र राहील.
यंदा रबीचेही विक्रमी क्षेत्र होते. नियोजित क्षेत्राचे ५० हजार हेक्टरमध्ये वाढ झाली व हे क्षेत्र सोयाबीनच्या क्षेत्रात रुपांतरित होणार आहे. त्यामुळे सोयाबीनचे २.७० लाख हेक्टरसाठी किमान २ लाख २ हजार ५०० क्विंटल बियाण्यांची जुळवणूक कृषी विभागाला करावी लागेल व याचा अंदाज यापूर्वीच आल्याने कंपन्यांद्वारा शेतकऱ्यांची फसगत होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी घरचे बियाणे राखून ठेवण्याचा सल्ला एसएओ विजय चवाळे यांनी वारंवार दिलेला आहे.
बॉक्स
सोयाबीन बियाण्यांचे असे आहे नियोजन
कृषी विभागाच्या माहितीनुसार यंदा सोयाबीनचे २.७० लाख हेक्टर असे विक्रमी क्षेत्र राहील व यासाठी किमान २,०२,५०० क्विंटल बियाण्यांची गरज भासणार आहे. यात ग्रामबीजोत्पादन अंतर्गत ७२,१८४ क्विंटल बियाणे उपलब्ध होईल. महाबीजद्वारा ८० हजार क्विंटल, याशिवाय राबिनीद्वारा ५ हजार क्विंटल व खासगीरीत्या ४५,३१५ क्विंटल बियाणे उपलब्ध होईल, असे नियोजन असले तरी यंदाचे नियोजन कोलमडण्याचा अंदाज आहे.
बॉक्स
बीटीच्या १२.५७ लाख पाकिटांची मागणी
यंदाच्या हंगामात संकरीत कपाशीचे २ लाख ५१ हजार ४१२ हेक्टर क्षेत्र राहणार आहे. बीजी-२ कपाशीचे १२ लाख ५७ हजार ७१० पाकिटे लागणार आहेत. यासाठी १९ खासगी कंपन्यांकडे मागणी नोंदविण्यात आल्याचे कृषी विभागाने सांगितले. यात ५ लाख क्विंटल बियाणे महाबीज उपलब्ध करेल. याशिवाय ५,६५५ क्विंटल बियाणे खासगी कंपनीद्वारा पुरविण्यात येणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले.
बॉक्स
अन्य पिकांच्या बियाण्यांचे नियोजन
सोयाबीन बीटीशिवाय संकरीत ज्वार २,००० क्विंटल, बाजरा ०.४ क्विंटल, मका २४०० क्विंटल, तूर् ५४६० क्विंटल, मूग ९६० क्विंटल, उडीद ८४० क्विंटल, भुईमूग ४५० क्विंटल, सूर्यफूल ५ क्विंटल, तीळ ५,६६० क्विंटल, धान २०० क्विंटल बियाण्यांची गरज भासणार आहे. यापैकी ४,८९५ क्विंटल महाबीज देणार, राबिनी ५०० क्विंटल व खासगीत १२,७७१ क्विंटल उपलब्ध होणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले.
पाॅईंटर
यंदा खरिपाचे प्रस्तावित क्षेत्र (हेक्टर)
सोयाबीन : २.७० लाख
कपाशी : २.५१ लाख
तूर : १.३० लाख
मूग : २० हजार
उडीद : १० हजार