अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक उच्च शिक्षणासाठी दोन लाखांचे अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:11 IST2021-06-25T04:11:07+5:302021-06-25T04:11:07+5:30

अमरावती : अनुसूचित जातीतील दहावीच्या परीक्षेत ९० टक्के किंवा त्याहून अधिक गुण प्राप्त केलेल्या आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना व्यावसायिक ...

Two lakh grant for vocational higher education to Scheduled Caste students | अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक उच्च शिक्षणासाठी दोन लाखांचे अनुदान

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक उच्च शिक्षणासाठी दोन लाखांचे अनुदान

अमरावती : अनुसूचित जातीतील दहावीच्या परीक्षेत ९० टक्के किंवा त्याहून अधिक गुण प्राप्त केलेल्या आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना व्यावसायिक उच्च शिक्षणाची पूर्वतयारीसाठी ११ वी व १२ वी या दोन वर्षात प्रत्येकी एक लाख याप्रमाणे दोन लाख रुपयांचे अनुदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने बार्टीमार्फत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सामाजिक न्याय विभागाने घेतला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख पेक्षा कमी असणे गरजेचे आहे.

अनुसूचित जातीतील गरीब कुटुंबातील मुलांना एमएच-सीआयटी, जेईई, नीट यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या पूर्वतयारीसाठी ही रक्कम लाभदायक ठरणार आहे. याबाबत विद्यार्थी व पालकांकडून करण्यात येणारी मागणी पाहता ही योजना लागू करण्याबाबत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी निर्देश दिले होते. बार्टीच्या ३० व्या नियामक मंडळाची २१ जून रोजी बैठक पार पडली असून या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सुरू करण्यात येत असलेल्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे एकूण वार्षिक उत्पन्न २.५ लाखांच्या आत असणे अनिवार्य असणार आहे. शासकीय सेवेत नोकरीला असणाऱ्या पालकांच्या पाल्यांना ही योजना लागू असणार नाही. उत्पन्नाचा व जातीचा प्रमाणित दाखला देणे अनिवार्य असणार आहे. विशेष म्हणजे या योजनेमधील लाभार्थी संख्या अमर्यादित असणार आहे, अशी माहिती बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी दिली आहे.

या योजनेचा लाभ तळागाळातील गरीब कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांना आपले भविष्य घडवण्यासाठी मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून निश्चितच ही योजना सफल करू, असा विश्वास सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे. ११ वी व १२ वी मध्ये उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी दरवर्षी दिले जाणार एक लाख रुपये, आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.

Web Title: Two lakh grant for vocational higher education to Scheduled Caste students