नाकाबंदीदरम्यान दोन लाखांची रोख जप्त
By Admin | Updated: November 16, 2016 00:16 IST2016-11-16T00:16:40+5:302016-11-16T00:16:40+5:30
नाकाबंदीदरम्यान राजापेठ पोलिसांनी गोपालनगर टी-पॉर्इंटवर एका कारमधून दोन लाखांची रोख सोमवारी रात्री जप्त केली.

नाकाबंदीदरम्यान दोन लाखांची रोख जप्त
गोपालनगर टी-पॉर्इंटवरील घटना : राजापेठ पोलिसांची कारवाई
अमरावती : नाकाबंदीदरम्यान राजापेठ पोलिसांनी गोपालनगर टी-पॉर्इंटवर एका कारमधून दोन लाखांची रोख सोमवारी रात्री जप्त केली. ती रोख नागपूर येथे रूग्णालयीन कामाकरिता नेत असल्याचे संबंधित कारचालकाने सांगितले आहे. मात्र, पाचशे व हजारांच्या नोटा चलनातून बाद झाल्यामुळे पोलिसांनी ती रोख जप्त केली आहे.
शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत दररोज रात्री नाकाबंदी केली जात आहे. यामार्गाने ये-जा करणाऱ्या वाहनांची तपासणी करून नियमबाह्य वाहनांवर कारवाई केली जात आहे. सोमवारी रात्री राजापेठ ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिशीर मानकर यांच्या नेतृत्वात गोपालनगर टी-पॉइंटवर नाकाबंदी सुरू होती. दरम्यान नागपूरवरून अकोला मार्गाकडे जाणाऱ्या एका कारची पोलिसांंनी तपासणी केली. त्याकारमध्ये दोन लाखांची रोख रक्कम आढळून आली. ती कार किशनचंद गगनानी (रा.भीमचौक, आहुजानगर, नागपूर) यांची होती. पोलिसांनी कार मालकाची चौकशी केली असता ती रोख नागपूरवरून अमरावती जात असल्याची माहिती मिळाली. अकोला जिल्ह्यातील कराड येथील रूग्णालयात नातेवाईक दाखल असून त्यांच्या उपचाराकरिता ती रोख नेत असल्याची माहिती कारमालकाने पोलिसांनी दिली. मात्र, पाचशे व हजारांच्या नोटा चलनातून बाद झाल्यामुळे पोलिसांनी ती रोख जप्त केली. मंगळवारी संबंधित प्रकरणाचे दस्तऐवज पोलिसांनी न्यायालयात सादर केले असून कार मालकानेही पैसे मिळविण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. (प्रतिनिधी)
नाकाबंदीदरम्यान कारमध्ये दोन लाखांची रोख आढळून आली. रुग्णालयीन कामकाजाकरिता ती रोख नागपूर येथे नेत असल्याचे कार मालकाने सांगितले. मात्र, पाचशे व हजारांच्या नोटा चलनातून बाद झाल्याने ती रोख जप्त करावी लागली. न्यायालयीन आदेशानंतर पुढील कारवाईची दिशा ठरविण्यात येईल.
- शिशीर मानकर, पोलीस निरीक्षक, राजापेठ पोलीस ठाणे.