स्लॅब कोसळून दोन मजूर गंभीर
By Admin | Updated: July 17, 2016 00:04 IST2016-07-17T00:04:42+5:302016-07-17T00:04:42+5:30
चौथ्या मजल्याच्या पायऱ्यावरील स्लॅब कोसळून दोन मजूर गंभीर जखमी झालेत.

स्लॅब कोसळून दोन मजूर गंभीर
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलजवळील घटना : जखमींना खासगी रुग्णालयात हलविले
अमरावती : चौथ्या मजल्याच्या पायऱ्यावरील स्लॅब कोसळून दोन मजूर गंभीर जखमी झालेत. ही घटना शनिवारी दुपारी १२ वाजतादरम्यान विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयालगत इमारतीत घडली. शालीकराम यादव (४०) व तामसेन शिवप्रसाद यादव (३८,रा. चुरी, जि. छिंदवाडा) असे जखमी मजुरांची नावे आहेत.
जिल्हा स्त्री रुग्णालय व विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थानांचे बांधकाम सुरू आहे. ६ कोटी ८७ लाख ४५ हजार ५८५ रुपये किमतीच्या या कामाचा कंत्राट नागपूर येथील पटेल कंस्ट्रक्शन कंपनीकडे आहे. दीड वर्षांपासून हे बांधकाम सुरू असून आतापर्यंत चार इमारतींचे काम पूर्ण झालेले आहे. या पाचव्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर स्लॅब टाकण्याचे काम शनिवारी सुरू होते. दरम्यान हा अपघात घडला. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर स्लॅब टाकण्याचे काम सुरु होते. यावेळी तेथे सात ते आठ मजूर काम करीत होते. क्रेंनद्वारे स्लॅबवर माल टाकत असताना दोन मजूर ट्रॉलीतील माल व्यवस्थीत काढण्याकरिता स्लॅबवर उभे होते. दरम्यान अचानक स्लॅबसह दोन्ही मजूर खाली कोसळले. अन्य मजुरांना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. दोघांचीही प्रकृती गंभीर असल्यामुळे संबंधित कंत्राटदाराने त्यांना खासगी रुग्णालयात हलविले आहे. याप्रकरणात पुढील चौकशी गाडगेनगर पोलीस करीत आहेत.
'बी अॅन्ड सी'ला विचारला जाब
बांधकाम करताना कंत्राटदाराने मजुरांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. मात्र, या इमारतीच्या बांधकामवेळी सुरक्षेचा अभाव आढळून आले. स्लॅबखाली अर्धे सेन्ट्रींग लावल्याने ते चौथ्यां मजल्यावरून खाली कोसळले.
त्याच बांधकामस्थळी अभियंता उपस्थित असणे आवश्यक असते. मात्र, स्लॅब टाकण्याचे काम सुरू असताना अभियंता उपस्थित नसल्याचे मत अमरावती युवा संघर्ष समितीचे आहे. या घटनेसंदर्भात सखोल चौकशी करावी, इमारत बांधकामाची गुणवत्ता तपासावी, अशी मागणी शनिवारी निवेदनाद्वारे 'बी अॅन्ड सी'चे अधीक्षक अभियंत्याला करण्यात आली. समितीचे धीरज श्रीवास यांच्या नेतृत्वात वैभव वानखडे, श्रीधर देशमुख, सुधीर खंडारे,उमेश सुलताने, बाबा मिश्रा, आनंद जोशी,नीलेश इंगोले, कुलदीप श्रीवास, रितेश दायमा आदी उपस्थित होते.
के्रनद्वारे स्लॅबवर माल टाकण्याचे काम होत असताना अचानक के्रनची ट्रॉली स्लॅबला लागली. त्यामुळे तो कच्चा स्लॅब खाली कोसळून दोन मजूर जखमी झाले. त्यावेळी आमचे अभियंता तेथे उपस्थित होते. हा अपघात आहे. त्यामुळे दोष कोणाला देऊ शकत नाही.
एस.आर. जाधव, कार्यकारी अभियंता. बी अॅन्ड सी.